वार्ताहर / कुदनूर
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळल्यामुळे बेळगाव हॉटस्पॉट ठरले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधून सीमाभागात होणारी संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकातील दोघांवर शुक्रवारी रात्री दुचाकीवरून गावठी दारुची वाहतूक करताना किटवाड गावानजिक कोवाड पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई करत असताना पोलिसांना किटवाड ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
याबाबतची अधिक माहिती अशी, जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. यासाठी तालुक्यातील गावचे प्रवेश मार्ग बंद करण्यासह बाहेरील व्यक्तिंना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास किटवाड गावानजिक जोतिबा ईश्वर रुटकुटे (वय २८, रा. कडोली, ता. बेळगाव) व नागराज आपय्या पाटील (वय २०, रा. गुंजेनहट्टी, ता. बेळगाव) हे होसूर येथून दुचाकीवरून (केए-२२-ईए-६८८९) गावठी दारुची वाहतूक करत असताना त्यांच्यावर कोवाड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत किटवाड ग्रामस्थांचे पोलिसांना सहकार्य लाभले. दोघा संशयितांना दारुचे १० लिटर केन आणि हिरो होंडा दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे. दारुची विनापरवाना वाहतूक आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोवाड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करत आहेत.