येळ्ळूर रस्त्यावरील घटनेने तीव्र संताप
प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर रस्त्यावरील शिवारामध्ये पाटर्य़ांना ऊत आला आहे. मनसोक्त दारू ढोसून सिगारेट ओढणे असे प्रकार सर्रास ठिकाणी सुरू आहेत. मात्र यामधून शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी अज्ञातांनी शेतामध्ये पार्टी केली आणि जाताना गवतगंजीलाच आग लावून गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाच ते सहा किंवा वीस ते पंचवीस जणांचे टोळके येळ्ळूर शिवारात दाखल होते. त्यानंतर पाटर्य़ांचे आयोजन करते. यामधील काही उत्साही तरुण दारू पिऊन दारुच्या बाटल्याही शिवारात फोडतात, असे प्रकार घडत आहेत. बऱयाचवेळी पत्त्यांचा डावही रंगला जातो. मात्र या प्रकारामुळे शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्तांना निवेदनही देण्यात आले होते. मात्र अजूनही रात्रीच्यावेळी वडगाव, शहापूर, येळ्ळूर, धामणे, अनगोळ, मजगाव परिसरात रात्रीच्यावेळी पाटर्य़ा सुरू आहेत. एखादा दिवस पार्टी केली तर चालेल. मात्र दररोज असे प्रकार घडत आहेत. यातूनच मंगळवारी काही अज्ञातांनी गवतगंजीला आग लावली. नारायण माळवी यांच्या मालकीची ती गंजी होती. त्यामध्ये जवळपास दोन ट्रक्टर गवत होते. असे प्रकार वारंवार घडत असतानाही याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱयांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त हेत असून तातडीने अशा व्यक्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









