अन्य एकाचा शोध सुरू, चार लाखांची केली होती फसवणूक
प्रतिनिधी/मिरज
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास दामदुफ्पट करुन देण्याचे अमिष दाखवून सुनिल श्रीपती तिवले यांची चार लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अक्षय अनिल कांबळे (वय 26, रा. सदाळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. याप्रकरणातील आणखी एका संशयीताचा शोध सुरु आहे.
अक्षय कांबळे, रविंद्र भोलानाथ देवणे (रा. वडणे जि. कोल्हापूर) या दोघांनी सान्विक वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुफ्पट नफा मिळविण्याचा त्यांचा उद्योग आहे. सदर दोघांनी सुनिल श्रीपती तिवले (वय 56, रा. जुना कुपवाड रोड, टीळकनगर, सांगली) यांची 29 जानेवारी रोजी फसवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून चार लाख रुपये घेऊन सदर दोघे गायब झाले होते. याबाबत तिवले यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी यापैकी अक्षय कांबळे याला कोल्हापूरातून अटक केली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक संशयीत रविंद्र देवणे याचा शोध सुरू आहे. संबंधीत दोघांनी आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधीत व्यक्तींनी महात्मा गांधी चौकी पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









