संशयाने चौकशी करताना सापडले घबाड ,गोवा कस्टम विभागाची यशस्वी कारवाई
प्रतिनिधी / वास्को
गोवा कस्टम विभागाच्या पथकाने दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीविरूध्द केलेल्या कारवाईत 95 लाखांचे सोने जप्त केले. 2 किलो 170 ग्रॅम वजनाचे हे सोने दुबईहून व्हाया दिल्ली गोव्यात आणण्यात आले होते. या तस्करी प्रकरणी कस्टम विभागाने एका हवाई प्रवाशाला अटक केली आहे. हा प्रवासी पश्चिम बंगालमधील नागरिक आहे.
कस्टमने शनिवारी रात्री ही कारवाई केली. गोवा कस्टमच्या दाबोळी विमानतळावरील पथकाला सोन्याच्या तस्करीचा सुगावा लागला होता. त्यामुळे या पथकाने विमानतळावर उतरणाऱया हवाई प्रवाशांवर पाळत ठेवली होती.
संशयानेच चौकशी करताना सापडले घबाड
कस्टमच्या पथकाने संशयानेच एका हवाई प्रवाशाची चौकशी केली असता त्याच्याकडे हे सोन्याचे घबाड आढळून आले. त्यामुळे कस्टमच्या अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सदर सोन्याची किंमत 95 लाख 3 हजार रूपये एवढी आहे.
विमानात सीटच्या खाली लपविले होते सोने
या तस्करीसंबंधी कस्टमकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर सोने दुबईहून विस्तार हवाई कंपनीच्या विमानातून गोव्यात आणण्यात आले होते. एका प्रवाशाने दुबईहून हे सोने भारतात आणण्याची जबाबदारी घेतली होती. त्याने हे सोने विमानातील आसनाखाली लपवले होते. त्यानंतर दुसऱया एका प्रवाशाने त्याच सिटवर बसून दिल्लीहून गोव्यात हे सोने आणण्याची जबाबदारी पार पाडली. मात्र, या तस्करीचा कस्टमच्या अधिकाऱयांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला.
देशी प्रवासी असल्याने कडक तपासणी होणार नाही.
हे सोने घेऊन सहजरित्या विमानतळाबाहेर निसटणे त्या हवाई प्रवाशाला शक्य झाले नाही. विमानतळाबाहेर पडण्यापूर्वी कस्टमने त्याची झडती घेऊन ते सोने सदर प्रवाशाकडून जप्त केले. दुबईहून भारतात आलेले विस्ताराचे विमान प्रथम दिल्लीत थांबले होते. त्यानंतर या विमानाचा दिल्ली ते गोवा असा देशी प्रवास होता. आंतरराष्ट्रीय नव्हे तर देशी हवाई प्रवासी असल्याने कडक तपासणी होणार नाही असा समज करून सदर प्रवाशाने तस्करी यशस्वी करण्याचे नियोजन केले होते. कस्टम कायदय़ाखाली या प्रवाशाला अटक करण्यात आलेली असून तो पश्चिम बंगालमधील नागरिक आहे.
गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हाय. बी. सहारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तस्करीविरूध्दची ही कारवाई गोवा कस्टमचे आयुक्त मिहिर रंजन तसेच संयुक्त आयुक्त एम. एस. मिना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. एप्रिल 2020 ते आतापर्यंत गोवा कस्टम विभागाने अडिच किलो 15 ग्रॅम वजनाचे व 1 कोटी 11 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने दाबोळी विमानतळावर जप्त केले असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे.









