प्रतिनिधी /वास्को
दाबोळी भाजपा मंडळातर्फे चिखली पंचायत सभागृह तसेच बोगमाळोतील बिच रिसोर्टमध्ये योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो सहभागी झाले होते. त्यांनी शिबिरात सहभागी झालेल्यांना मार्गदर्शनही केले.
चिखली व बोगमाळोतील शिबिरात भाजपा कार्यकर्ते व इतर जण सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक डॉ. नामदेव चोपडेकर तसेच योग शिक्षक गोसावी यांनी या शिबिरात सहभागी शिबिरार्थीना योगासनांसंबंधी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांबरोबरच मंत्री माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, नगरसेवक विनोद किनळेकर, चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, उपसरपंच कमला प्रसाद यादव, बोगमाळोच्या सरपंच लॉरेन डिकुन्हा, उपसरपंच संकल्प महाले यांनी योगासनांचा लाभ घेतला.
मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडूनही योग आणि आरोग्याच्या काळजीविषयी मार्गदर्शन
मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगा आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे याविषयी माहिती दिली. कधी कधी आपण भारतीय संस्कृतीतील ही महान देणगी ओळखायला विसरतो. जगातील इतर लोक या श्रीमंत परंपरेची दखल घेत तीचा वापर करतात. कोरोना काळात आपले आरोग्य सुरक्षीत ठेवण्यासाठी अनेकांना योग विद्येचा लाभ झाला. योग आपले शरीर संतुलीत ठेवते. या विद्येतून निवांतपणा अनुभवता येतो. तो एक शारीरीक आणि मानसिक व्यायाम आहे असे ते म्हणाले. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही क्रीया आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी गोष्टी शिकवलेल्या आहेत. या गोष्टी आपल्या अंगवळणी पडायला हव्यात अशी सुचना करताना मंत्री गुदिन्हो यांनी योगासनातील प्राणायम, अनुलोम विलोम तसेच कपाल भाती व इतर आसनांसंबंधी माहिती दिली.









