2022 अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार, साध्या सोहळय़ात प्रकल्पासाठी भूमीपुजन
प्रतिनिधी/ वास्को
भारतीय विमानतळ प्राधिकारणातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाचा भूमीपूजन सोहळा सोमवारी पार पडला. हा प्रकल्प 256 कोटींचा आहे. या विस्तार प्रकल्पामुळे दाबोळी विमानतळाचा 18 हजार चौ. मि. अतिरिक्त क्षेत्रात विस्तार होणार आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या दाबोळी विमानतळ प्रकल्पासाठी यापूर्वी 500 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. सध्या जुन्या विमानतळ प्रकल्पाच्या इमारतीची जमीनही दाबोळी विमानतळावरील साधनसुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येत आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी या उपलब्ध जमिनीच्या आधारे धावपट्टीचा विस्तार करून हवाई जहाजांसाठी समांतर पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. दाबोळी विमानतळ प्रकल्प आतापर्यंत 64 हजार चौ. मि. जमीनीवर उभा होता. आता अतिरिक्त 18 हजार चौ. मि. जमिनीवर विस्तारीत प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 256 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
प्रकल्प 2022 च्या अखेरपर्यंत पूर्णत्वास येणार
नवीन विस्तार प्रकल्पात बेसमेंटसह तळमजला व अन्य दोन मजले असतील. हा प्रकल्प 2022 च्या अखेरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. सोमवारी दुपारी अगदी साध्या समारोहात दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांच्या हस्ते या प्रकल्पासाठी भूमीपुजन करण्यात आले. या वेळी विमानतळ प्राधिकरणाचे अन्य अधिकारी व बांधकाम कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते.
विस्तारामुळे प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढणार
विमानतळाच्या या विस्तारामुळे प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. सध्याची 7.65 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता 13 दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दर तासाला आताच्या 500 संख्येवरून विस्तारीकरणानंतर 3250 प्रवासी हाताळले जाऊ शकतील. विस्तारीत विमानतळ प्रकल्पात वातानुकुलित 96 चेक इन काऊंटर्स, पुरूष, महिला व अपंग व्यक्तींसाठी शौचालये, बॅगेज कन्वेयर बेल्टस, रांगेत उभे राहण्यासाठी जागा, सेग्रीगेशन रेलिंग, एअरलाइन्ससाठी बॅकअप कार्यालये, वेगिंग मशिन्स, स्वयंचलित बॅगेज ड्रॉप सिस्टम, एक्स-बीआयएस मशीन्स, एस्केलेटर, इलेवेटर्स, फायर डिटेक्शन, आलार्म, प्रोटेक्शन सिस्टमसह फायर कंट्रोल रूम, बोर्डिंग गेटस्, रिटेल आणि एफ ऍण्ड बी स्टोअर्स, सीसीटीव्ही सिस्टम, दोन नवीन पॅसेंजर बोर्डिंग ब्रीज असतील.
सध्याच्या टर्मिनल इमारतीच्या अंतर्गत काही भागात बदल करून 15000 चौ. मी. जागेत एबी – 321/बी-737 प्रकारची दोन विमाने समावून घेण्याची सोय करण्यात आली आहे. देशी आणि विदेशी प्रवाशांसाठी पहिल्या आणि दुसऱया मजल्यावर बदल करण्याचे नियोजन केले आहे.









