वार्ताहर/ टाळसुरे
दापोलीत विनापरवाना बंदूक तस्करी रॅकेट प्रकरणी मुख्य सूत्रधार परेश धुरी याला सिंधुदुर्गमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य सूत्रधार दापोली पोलिसांनी अटक केल्यामुळे या प्रकरणात आणखी कितीजण सामील आहेत, याचा उलगडा होणार आहे.
परेश धुरी हा सिंधुदुर्ग जिह्यामधील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर 2018 साली कुडाळ पोलिसात विनापरवाना हत्यारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबतच आणखी कोठे त्याने बंदुकांची विक्री केली आहे, हे समोर येण्यास या अटकेमुळे मदत होणार आहे. दापोली पोलिसांनी बंदूक तस्करीप्रकरणी 14 आरोपीसह 16 बंदुका ताब्यात घेतल्या होत्या. यातील सर्व आरोपींना दापोली न्यायालयात जामीन मंजूर झाला होता. तालुक्यातील साकुर्डे येथील विनोद बैकर मृत्यूप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे बंदूक तस्करीचे मोठे रॅकेट शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
दापोली तालुक्यातील शिवाजीनगर भोंजाळी येथे राहणाऱया अमित रहाटे (28) हा सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ-पेंडूर येथील नानू पेंडूरकर याच्याकडून सुमारे 16 बंदुका विनापरवाना विक्रीसाठी दापोलीमध्ये घेऊन आला होता. नानू हा कुडाळ येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. नानू पेंडूरकर हा परेश ऊर्फ आप्पा धुरी याच्याकडून बंदुका घेत असल्याचे पुढे आले आहे. अमित याने दापोली तालुक्यातील नवशी तांबटवाडी येथील गणेश चोरगे, गिम्हवणे उगवतवाडी येथील राजाराम भुवड, जालगाव ब्राह्मणवाडीतील अमित आलम, जालगाव सुतारकोंड येथील आशिष मोहिते, मौजे दापोली येथील सौरभ म्हसकर, जालगाव श्रीरामनगर येथील अभिषेक जाधव, सौरभ घरवाळी, मौजे दापोली येथील विजय आंबेडे, कोळबेंद्रेच्या अनंत मोहिते, माथेगुजरच्या प्रशांत पवार, खेर्डीच्या नीलेश काताळकर, मौजे दापोलीच्या विश्वास कानसे, करंजाणीच्या नरेश साळवी यांना सुमारे 9 बंदुकांची विक्री केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. अमित रहाटेच्या घरी पोलिसांना 3 बंदुका व 4 बंदुकांचे अवशेष सापडले होते. अर्धवट जळालेल्या स्थितीत काही मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला होता. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या व्यतिरिक्त पोलिसांना चार कोरप, 4 चेंबर, 4 पेटय़ा, 4 ट्रिगर, 3 जिवंत काडतुसे, 1 ग्राईंडर व 10 बंदुकीच्या नळ्या सापडल्या होत्या.
या प्रकरणी पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हेडकॉन्स्टेबल विजेंद्र सातार्डेकर, कॉन्स्टेबल उदय मोनये, कॉन्स्टेबल कोमल ढोले व सुनील पाटील यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार बेकायदेशीररित्या विनापरवाना हत्यार बाळगणे, ते नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, या अन्वये भादंवि 201, 34 व भारतीय हत्यार कायदा 3/ 25 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दापोली पोलिसांनी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केलेल्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आणखी कोणाकडे अशा बंदुका आहेत का, याचा तपास पोलीस करीत होते. या प्रकरणातील परेश धुरी हा आप्पा या टोपण नावाने कुडाळमध्ये ओळखला जातो. तो सुमारे 4 वर्षापूर्वीपासून विनापरवाना बंदुका बनवून विकत असल्याचे पुढे आले आहे. दापोली परिसरात विक्री केलेल्या बंदुका 30 ते 35 हजार रुपये या दराने विकल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील सर्व पाळेमुळे खणून सर्व दोषींना गजाआड करणार असल्याचे दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे.









