प्रतिनिधी/दापोली
सोमवारी दापोली मधील माटवण येथील महिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आणखीन दोन युवकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दापोली तालुक्यातील माटवण येथील रहिवासी असणारी परंतु मुंबई येथे ट्रीटमेंट घेणारी महिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली यामुळे प्रशासनाची धावाधाव उडाली होती. त्यात 28 एप्रिल रोजी दापोलीत मुंबई येथून चालत आलेल्या युवकांत पैकी दोन युवकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा हादरले आहे.
हे युवक दापोली तालुक्यातील वनौशी व शिरदे गावातील असून ते 19 व 24 वर्षांचे आहेत. वनौशी येथील युवकासोबत त्याच्या घरातील अन्य चार सदस्य देखील दापोलीमध्ये मुंबई येथून चालत आले आहेत मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासनाने जरी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या 2 युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये अन्य कोण कोण व्यक्ती आल्या आहेत त्यांचा आता तपास घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या दोघांनाही शहरातील ए. जी हायस्कूल येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.