प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरात श्री समर्थ कृपा बचत गटाच्या माध्यमातून शिवभोजन सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे गरीब कुटुंबातील लोकांचे अतोनात हाल होत आहेत. काही कुटुंबांना रोजच्या जेवणाची भ्रांत पडलेली आहे. यामुळे प्रत्येक तालुक्यात शिवभोजन सेवेचा शुभारंभ करण्याचे सुतोवाच नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर दापोलीत डॉ. काणे यांच्या एक्स-रे क्लिनिकच्या बाजूला मुरकर यांच्या निवासस्थानी या शिवभोजन सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
दापोलीत ही सेवा दुपारी 12 ते 2 या वेळेत सुरू राहणार आहे. या सेवेचा शुभारंभ नगराध्यक्षा परविन शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेनेचे नेते सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, पंकज सुर्वे यांच्यासह महिला आघाडी अध्यक्षा सौ. मानसी विचारे, माजी नगराध्यक्षा उल्का जाधव, नगरसेवक व बचत गटाच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.