प्रतिनिधी/ दापोली
पूर्ण क्षमतेने भरलेला कंटेनर चढ चढताना उलट दिशेने आल्याने कंटेनरच्या मागे दुचाकीवर असलेला कृषी विद्यापीठाचा कर्मचारी चिरडून ठार झाल्याची घटना दापोली तालुक्यात नवशी फाटय़ाजवळ सोमवारी सकाळी घडली.
तालुक्यातील टेटवली-कदमवाडीतील सुरेश कात्रे (45) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. ते सकाळी आपल्या कामावर निघाले होते. कुंभवे येथील नदीच्या पुलावरून जात असता त्यांच्यापुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे आपली मोटरसायकल घेऊन दापोलीकडे येत होते. अचानक हा कंटेनर उलटय़ा दिशेने मागे आला. या कंटेनरने चिरडल्ल्याने सुरेश कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला.
मागे आलेल्या कंटेनरच्या मागील चाकाखाली सुरेश कोत्रे गाडीसह चिरडले गेले. अपघातानंतर कंटेनर चालक व क्लिनरने गाडी तेथेच सोडून पळ काढला. ही अवजड गाडी थोडी पुढे केल्याशिवाय कात्रे यांचा मृतदेह बाहेर काढणे शक्य नव्हते. अखेर पोलिसांनी त्याच रस्त्यावरून जाणाऱया एसटी बस व ट्रक चालकांना गाडी पुढे करून देण्याची विनंती केली. मात्र सर्वांनी असमर्थता दर्शवल्यामुळे घटनास्थळी बराचवेळ वहातुकीचा खोळंबा झाला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निनाद कांबळे अधिक तपास करत आहेत. मृत सुरेश कात्रे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.









