दापोली / प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीच्या मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमना बाबत दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी व विना परवाना मिरवणूक काढल्या प्रकरणी ठपका ठेवून निवडून आलेल्या तब्बल 8 नगरसेवकांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 19 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्याने तहसिलदार कार्यालयासमोर खालीद अब्दुल्ला रखांगे, मेमन अरिफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रविंद्र गंगाराम क्षिरसागर, अजिम महमद चिपळुणकर व इतर उमेदवार व त्यांचे सुमारे 100 ते 150 कार्यकर्ते यांनी जमाव केला. तसेच दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडुन आल्यानंतर विजयाचा उत्सव साजरा केला. त्याच प्रमाणे घोषणाबाजी करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, त्यांच्या कृत्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग पसरणार आहे हे स्वत:ला माहीत असुन देखील सामाजिक भान न ठेवता विनामास्क राहून जिल्हाधिकारी यांचे आदेशांचे उल्लघन केले. म्हणुन सरकारतर्फे त्यांचे विरुद्ध भा. द. वि. क. 269, 270, 34, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(1) (ब), प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.