वार्ताहर / मौजे दापोली
दापोलीत दुकानांत ग्राहकांमध्ये अंतर, आलेल्या ग्राहकांच्या तोंडाला मास्क अशा अनेक गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी दापोली प्रशासनाकडून पथक नेमण्यात येणार आहे. ज्या दुकानात शासनाने घातलेल्या नियमांचे भंग होईल अशांवर हे पथक दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या कार्यालयात व्यापाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुकानदारांना शासनाच्या नियमांची आठवण करून देत, नियम अटीं सांगण्यात आल्या. ज्या दुकानदारांच्या दुकानामध्ये शासनाने घातलेल्या नियमांचे पालन होत नसेल, अशा दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच दापोली तहसिलदार कार्यालय, नगरपंचायत, पोलीस स्थानक अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक दापोलीतील दुकानदारांवर व तेथे येणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवणार आहे.
सदरचे पथक दोन दिवसात तैनात होणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी दापोलीत दुकानदारांना आपली दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु ग्राहक झुंबड करून येतात. आणि दुकानामध्ये गर्दी करतात. अशावेळी दुकानदारांनी आपल्या ग्राहकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. या बैठकीला दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, मुख्याधिकारी कविता बोरकर, नगरपंचायतीचे नगरसेवक, दापोलीतील व्यापारी, दुकानदार उपस्थित होते.
Previous Articleरत्नागिरी : दापोलीतील बंद एस. टी. फेऱ्या तात्काळ सुरू करा
Next Article छत्तीसगड : रायपूरमध्ये 22 ते 28 जुलै पुन्हा लॉक डाऊन








