प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील आंजर्ले-सावने पुळण दरम्यान कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून व पाठलाग करत समुद्रात बेकायदेशीर डिझेल तस्करीची बोट पकडली. बोटीचे नाव मंगलमूर्ती असून बोटीवरील तीन खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
समुद्रात बेकायदेशीर डिझेल साठा असलेली मंगलमूर्ती बोट दत्ताराम भगवान कुलाबकर यांच्या मालकीची असून पकडलेली बोट जप्त करून दाभोळ बंदरात सील करून ठेवण्यात आली आहे. या बोटीवरील वामन रघुवीर (तांडेल), चंदू गोविंद झोप, संतोष बाळाजी झोप या तिघांना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास दापोली कस्टम विभागाचे उपायुक्त अमित नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या बोटीवरून 8500 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. दापोली कस्टम विभागाने एका महिन्यात दुसऱ्यांदा बेकायदेशीर डिझेल तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई केल्याने डिझेल तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कस्टम विभागाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘तरूण भारत’ने वाचा फोडली!
दापोली तालुक्यातील समुद्रात बेकायदा डिझेल विक्री होत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी केवळ ‘तरूण भारत संवाद ’ने प्रसिध्द केले होते. यामुळे कित्येक वर्षांचा हा गोरखधंदा चव्हाट्यावर येऊन यानंतर कस्टम विभागाला जाग येऊन त्यांनी दाभोळ व आता सावने येथे बेकायदा डिझेल विक्री करणारी बोट पकडली आहे. दरम्यान ‘तरूण भारत’ने या विषयाला वाचा फोडली.









