प्रतिनिधी/ दापोली
देशभरात फैलावत असलेल्या बर्ड-फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरात गुरुवारी सकाळी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दापोली नगरपंचायत कचरा विभागाच्या कर्मचाऱयांना गुरुवारी सकाळी शहरातील काळकाई कोंड येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले. नगरपंचायतीच्या माध्यमातून ही गोष्ट शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी हे कावळे प्रयोगशालेय तपासणीसाठी पुण्याला पाठवल्याची माहिती दिली. तेथून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निश्चित माहिती देता येईल, असे त्यांनी सांगितले.
दापोलीमध्ये अन्य ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळून आले तर त्यांना हात न लावता पशुवैद्यकीय अधिकाऱयांना कळवावे, असे आवाहनही डॉ. लोंढे यावेळी केले. महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची साथ नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.









