वनविभागाने घेतले तरूणाला ताब्यात
प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. दापोली वनविभागाने करंजाळी गावातील बालगुडेवाडी येथील कल्पेश तुकाराम बालगुडे याला कासव व खवले मांजर शिकार प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
दापोली वनविभागाने गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील करंजाळी बालगुडेवाडी येथे छापा टाकला. यात कल्पेशच्या घरामध्ये कासवाचे कवच, खवले मांजराची पिशवीत भरून ठेवलेली अडीच किलो खवले व जीवंत जंगली ससा सापडला. वनविभागाने या प्रकरणी कल्पेश याला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी कल्पेश याच्या अन्य साथीदारांचा व या प्रकरणी वापरलेल्या साहित्याचा तपास सुरू केला आहे.
वनविभागाने कासव व खवले यांचे डीएनएसाठी नमुने घेतले आहेत. तसेच जंगली सशाला जंगलात सोडण्यासाठी कोर्टाची परवानगी मागितली आहे. हा छापा चिपळूण विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली वनाधिकारी वैभव बोराटे, वनपाल गणेश खेडकर, अनिल दळवी, तसेच गणपत जळणे, महादेव पाटील, सुरज जगताप, सुरेखा जगदाळे, आर. डी. पाटील, परमेश्वर डोईफोडे आदी वनरक्षकांनी घातला.









