प्रशासनाचा गलथानपणा आला चव्हाटय़ावर
प्रतिनिधी/ दापोली
दापोली तालुक्यातील संशयित कोरोना रुग्णांसाठी शहरातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील किसान भवनानजीकच्या शेतकरी भवनात उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरवर युवा सेनेने धडक देत तेथील तेथील गैरसोईबाबत उपस्थित कर्मचाऱयांना जाब विचारला.
शेतकरी भवनात कोरोना रुग्णांसाठी अलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात गैरसोयी असल्याच्या तक्रारी युवा सेनेकडे प्राप्त झाल्या. यानंतर दापोली शहर युवा सेना अधिकारी स्वप्नील पारकर, नगराध्यक्षा परवीन शेख, नगरसेवक केदार परांजपे व युवा सैनिकांनी रविवारी प्रत्यक्ष कोरोना सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तेथे स्वॅब घेण्यासाठी दिवसभरात कोणीही आलेले नसल्याचे, रुग्णांना आंघोळ व पिण्यासाठी गरम पाणी देण्यात येत नसल्याचे आढळून आले. तसेच कोरोना रुग्णांची दोन दिवसांत तपासणीदेखील करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी तेथे उपस्थित कर्मचाऱयांना याचा जाब विचारला. यावर हिटर बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय येथे अस्वच्छतादेखील या पथकाला आढळून आली. यानंतर त्यांनी दापोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पितळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर नगरसेवक केदार परांजपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱयांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता तेथे तत्काळ सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. युवा सेनेच्यावतीने शेतकरी भवनात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकने प्रशासनाचा गलथानपणा चव्हाटय़ावर आला आहे.









