प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला असला तरी पाळीव पक्ष्यांना याचा प्रादुर्भाव झालेला नाही यामुळे कोणत्याही क्षेत्रात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेला नसल्याची माहिती दापोली पशु वैद्यकीय उपायुक्त डॉ. मुकुंद लोंढे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली आहे. यामुळे चिकन व अंडी व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, दापोलीमध्ये जे पक्षी मृत्युमुखी पडलेले आहेत ते पाळीव पक्षी नाहीत. ते जंगली पक्षी आहेत. पाळीव पक्षांना आत्तापर्यंत दापोलीत बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची एकही केस नोंदवण्यात आलेली नाही यामुळे दापोली कोणत्याही प्रकारचा कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेला नाही. मात्र लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या पाळीव पक्षांना जंगली पक्ष्यांचा संपर्क येणार नाही याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे अशांनी आपल्या कुक्कुटपालन केंद्रांमध्ये निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे.
पाळीव पक्ष्यांना अद्याप बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याने दापोलीकरांनी घाबरून जाऊ नये. शासनाकडून घेणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे देखील डॉ मुकुंद लोंढे तरुण भारतशी बोलताना म्हणाले.









