दापोली/ प्रतिनिधी
मुंबई वरून थेट दापोली शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात घुसलेल्या तिघांना काळकाई कोंड येथील सतर्क नागरिकांमुळे क्वारंटाईन व्हावे लागले
दापोलीत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यात एका रुग्णाच्या हातावर त्याचा रिपोर्ट येण्याआधीच शिक्का मारून घरी पाठवले होते. हा रुग्ण ज्या ज्या भागात फिरला त्या त्या भागाला सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे. हा सर्व भाग दापोली शहराच्या पूर्वेकडे काळकाई कोंड परिसरात येतो. या काळकाई कोंड परिसरात आज सकाळी मुंबईवरून खाजगी गाडीतून एक कुटुंब आले. हे कुटुंब मुंबई येथे सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन व तपासण्या करून आले होते.
मुंबई येथून दापोलीत जाताना त्यांना दापोली येथे गेल्यावर पुन्हा तपासणी करून घ्या असे बजावण्यात आले होते, तरीदेखील दापोली प्रशासन आपल्याला पुन्हा क्वारंटाईन करेल व आपल्याला 14 दिवस विलागीकरण कक्षात राहावे लागेल या भीतीपोटी या सर्वांनी उपजिल्हा रुग्णालयात जाणे टाळले व आपली गाडी थेट काळकाई कोंड येथील समाज मंदिराच्या जवळ असणाऱ्या आपल्या घरी नेली. सध्या हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या घराच्या आजूबाजूचे नागरिक सतर्क होते. त्यांनी आपल्या शेजारी मुंबईतून आलेल्या या सर्वांची चौकशी केली. शिवाय त्यांनी दापोली प्रशासनाला मुंबईतून आल्याबाबत कळवले आहे का ? असेदेखील विचारणा केली. मात्र या कुटुंबाकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी येथील नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांना ही गोष्ट कळवली. येथील लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट दापोली प्रशासनाला कळवल्यावर त्यांनी माघार घेऊन आपण दापोली आलो असल्याचे प्रशासनाला कळवले प्रशासनाने देखील तातडीने या तिघांची तपासणी करून त्यांना आता क्वारंटाईन केले आहे.
Previous Articleअनगोळ येथे फांदी पडून कारचे नुकसान
Next Article आयुष प्रणालीद्वारे ‘पन्नास’ वरील नागरिकांना औषधे









