वार्ताहर/ मौजेदापोली
आता दापोलीतही व्हॉटस्ऍपवर 25 लाखांच्या लॉटरीचे ऑडिओ मेसेज येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र हे मेसेज बनावट असल्याचे समोर आले असून कोणीही अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आपण ज्या नंबरने व्हॉटस्ऍप चालवत आहात त्या नंबरला 25 लाखांची लॉटरी लागली आहे, आपले केबीसी या संस्थेकडून अभिनंदन. सोबत पाठवलेल्या पत्रकावरील नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि ऑनलाईन फोन करा, असे सांगणारा ऑडिओ व सोबत एक माहितीपत्र पाठवले जात आहे. या माहितीपत्रात एसबीआय बँकेचा लोगो असून अमिताभ बच्चन यांचा फोटोही आहे. यासोबत लॉटरी नंबरही देण्यात आला आहे. शासनाची मुद्रा असलेले शिक्केदेखील दर्शविण्यात आले आहेत. या बाबत एसबीआय बँकेत चौकशी केली असता अशा लॉटरीसंदर्भात माहिती नसून हे मेसेज खोटे असल्याचे समोर येत आहे.
या ऑडिओसह पाठवण्यात आलेल्या पत्रकात राणा प्रताप सिंग असे नाव व मोबाईल नंबर देण्यात आला आहे. मात्र या नंबरवर फक्त व्हॉटस्ऍपने कॉल करा, असे सांगितले जात आहे. ग्रामीण भागांतील लोक या लॉटरीसंदर्भात चौकशी करत आहेत. मात्र हे मेसेज फेक असल्यामुळे व्हॉटस्ऍप वापरकर्त्यांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय असे कोणतेही कॉल करू नयेत. यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सावधान राहण्याचे आवाहन दापोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जिल्हय़ात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढताहेत
दापोलीसह जिल्हय़ात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सुशिक्षित लोकही याला बळी पडत आहेत. कोणालाही कोणत्याही प्रकारची खासगी तसेच बँक खात्याची माहिती देऊ नये, असे आवाहन दापोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.









