प्रतिनिधी / दापोली
दापोली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असल्याने दापोली शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरू होईल, अशी माहिती महादेव रोडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दापोलीला नारगोली येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. येथील विजेच्या खांबांवर देखील झाडे पडल्याने तेथील पाणी उपसा ठप्प झाला आहे. यामुळे दापोली शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे.
यावर उपाययोजना म्हणून दापोली नगरपंचायत तिने तातडीने दोन जनरेटर भाड्याने घेतले आहेत. या जनरेटरच्या माध्यमातून दापोली शहरातील पाण्याच्या सर्व टाक्या शुक्रवारी भरण्यात येतील व शहराला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती महादेव रोडगे यांनी यावेळी बोलताना दिली. त्याच प्रमाणे वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद असल्याने नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील महादेव रोडगे यांनी यावेळी बोलताना केले.









