प्रतिनिधी/ कोल्हापूर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली ? बंद पडणाऱया स्कुटरवरून फिरणाऱयांनी साखर कारखाना कसा उभारला ? असा आरोप केला आहे. पण त्यांनी भाजपच्या सत्ता कालावधीतील पाच वर्षात काय केले ? त्यांची पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय आहे याची चौकशी निश्चितपणे होईलच. यावेळी पाच वर्षात काय केले याचा त्यांच्याकडून हिशोब घेतला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.
19 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू समाधीस्थळ लोकापर्ण सोहळा होणार आहे. या सभारंभाच्या पूर्वतयारीसाठी शहर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर ऍड सुरमंजिरी लाटकर, शहराध्यक्ष आर.के.पोवार, राजेश लाटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ए.वाय.पाटील म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्याना विश्वासात घेऊन गेल्या पाच वर्षापूर्वीच साखर कारखाना उभारला आहे. तर मंत्री सतेज पाटील हे गर्भश्रीमंतच आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीबाबत कोणीही बोलू नये. पण चंद्रकांत पाटील यांना गेल्या पाच वर्षात काय केले ? याचा आता हिशोब द्यावा लागेल. त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. हा पुणे जिल्हा नाही, कोल्हापूर आहे याचे त्यांनी बोलताना भान ठेवावे. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी त्यांनी जनहितासाठी सरकारच्या योजना राबविण्यासाठी सहकार्य करावे,. यापुढे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यास आणि आरोपांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.
महापौर ऍड.सुरमंजिरी लाटकर म्हणाल्या, शाहू समाधीस्थळ लोकापर्ण सोहळा हा त्यांच्या करवीरनगरीमध्ये भव्य दिव्य पद्धतीनेच साजरा केला जाणार आहे. हा सोहळा लोकोत्सव करण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिह्यातील शाहू प्रेमी जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे.
शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याबरोबरच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी नेतेगण उपस्थित राहणार आहेत. शाहू समाधीस्थळ लोकार्पण सोहळ्यानंतर दसरा चौकातील मैदानावर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी व्ही.बी.पाटील, परिक्षीत पन्हाळकर, जयकुमार शिंदे,किसन कल्याणकर, अनिल कदम आदी उपस्थित होते.









