बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे नागरिक बाजारपेठ सुरू होताच गर्दी करताना दिसत आहेत. शनिवारी दाणे गल्ली शहापूरमध्ये भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आठवडी बाजार सराफ गल्लीमध्ये भरतो. मात्र आठ दिवसांपासून दाणे गल्लीमध्ये भाजी विक्री होत आहे. त्यामुळे या वेळेत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील गर्दी टाळण्यासाठी सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंसाठी धावपळ होताना दिसून येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शहापूर दाणे गल्लीत सकाळच्या वेळेत भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ वाढलेली पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहापूर येथील भाजी विक्री बंद होती. मात्र, मागील आठवडय़ापासून सकाळच्या वेळेत भाजीपाला विक्री होताना दिसून येत आहे. दरम्यान, मागील आठवडय़ात पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी विपेत्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता.
जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते बंद ठेवून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध घालण्यात आले असून शहरात मेडिकल, हॉस्पिटल सुविधा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक अडचणीत आले आहेत. मध्यंतरी रविवार पेठ खुली करण्यात आली होती. दरम्यान, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करून नियमाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे रविवारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.









