प्रतिनिधी / ओटवणे:
सावंतवाडी-बेळगाव या राज्यमार्गावर दाणोलीनजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा जागीच ठार झाला. मंगळवारी सकाळी या राज्य मार्गाच्या लगत गटारात हा मृत गवा ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर हा अपघात उघड झाला.
वनविभागाच्या देवसू विश्रामगृहापासून अवघ्या 100 मीटरवर राज्य मार्गावर अपघातात गवा गतप्राण झाल्याची बातमी दाणोली पंचक्रोशीत परिसरात समजताच या घटनेची माहिती वनखात्याला दिली. आंबोली वनविभागाचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, देवसू वनपरिमंडळाचे वनपाल सिद्धार्थ आरेकर, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, गोरख ढेरे, हेमराज बागूल, वनमजूर शिवाजी सरमळकर, काशिराम गावडे यांचे वनपथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आंबोलीच्या दिशेने जाणाऱया आयशर टेम्पो अथवा डंपरच्या धडकेत हा गवा राज्यमार्गाच्या गटारात फेकला जाऊन त्याचा मृत्यू झाला. या धडकेमुळे गाडीची दर्शनी काच फुटून रस्त्यावर काचेचा खच पडला होता. देवसू जंगलातून केसरी फणसवडेच्या जंगलात जाण्याच्या प्रयत्नात रस्ता ओलांडताना या गव्याचा बळी गेला. तीनचार वर्षाचा हा गवा होता. या अपघातात गव्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दाणोलीचे पशुवैद्यकीय अधिकारी एस. टी. फणसे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर जंगलात मृत गव्यावर वनकर्मचाऱयांनी अंत्यसंस्कार केले.









