प्रतिनिधी/ सातारा
आमच्या आईला असे दागिने करायचे आहेत. तुमच्या दागिण्यांचा फोटो काढून घेतो, असे सांगून हातचलाखीने दोन अनोळखी इसमांनी वृद्ध महिलेचे दागिणे लांबविले. हि घटना येथील सदरबझार येथे शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून यातून चोरटय़ांनी महिलेस लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शशिकला बाबुराव जगताप (वय 70, कदमबाग सदरबझार, सातारा) हि वृद्ध महिला दि. 4 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरापासून चालत निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यात त्यांना दोन अनोळखी इसम भेटले. त्यांनी शशिकला जगताप यांना तुमच्या गळ्यातील माळ व हातातील बांगडय़ा छान आहेत. तशाच मला आमच्या आईला घ्यायच्या आहेत, तुमच्या दागिण्यांचा फोटो घेतो, असे सांगून वृद्धेचे दागिणे फोटो काढण्यासाठी त्या दोन अनोळखी इसमांनी घेतले. त्यानंतर बराच वेळ वृद्धेशी बोलत बोलत हातचलाखीने त्यांची माळ व बांगडय़ा लंपास केल्या. त्यातून त्या अनोळखी इसमांनी माळ व बांगडय़ा असे सोन्याचे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे दागिणे दागिणे लंपास करुन गंडा घातला.
दोन्ही अनोळखी इसम दागिणे घेवून फरार झाले. त्यांनंतर काही वेळाने हि गोष्ट शशिकला जगताप यांच्या लक्षात आली. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दोन अज्ञात चोरटय़ांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









