पाकिस्तानची दुटप्पी नीती पुन्हा उघड : ढोंगीपणाबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाला चिंता
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या दुटप्पी नीतीचा पर्दाफाश करणारा आणखी एक मोठा खुलासा झालेला असून फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) कारवाईची तलवार डोक्मयावर टांगलेली असूनही त्यांच्याकडून दहशतवाद्यांना पाठबळ देणे आणि ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम, पाकस्थित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा (केझेडएफ) दहशतवादी रणजितसिंग नीता यासह अनेकांना अतिमहनीय वागणूक देणे कायम असल्याचे दिसून आले आहे.
दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे नाटक करून प्रत्यक्षात त्यांना आतून निधीचा पुरवठा करत असलेल्या पाकिस्तानच्या या ढोंगीपणाबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाला चिंता वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार गेल्या महिन्यात ज्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यांच्यासह 21 दहशतवाद्यांना अतिमहनीय व्यक्तीसारखी सुरक्षा देत आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या यादीनुसार या अतिरेक्मयांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (बीकेआय) प्रमुख वाधवा सिंग, इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) प्रमुख रियाज भटकळ, दहशतवादी मिर्झा शादाब बेग आणि आफिफ हसन सिद्दीबापा यांचा समावेश आहे.
पाक कारवाईचा देखावा करत असल्याचे मत
सदर यादीतील बरेच दहशतवादी असे आहेत की, जे भारताला हवे असून पाकिस्तान त्यांना आश्रय देत आहे. दहशतवादी गटांना निधी पुरवून त्यांना प्रशिक्षण देणाऱया आणि भारताविरुद्ध अतिरेकी कारवाया करण्यासाठी त्यांना शस्त्रे देणाऱया पाकिस्तानला भारताने वारंवार उघडे पाडलेले आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून पॅरिसस्थित ‘एफएटीएफ’चा रोष टाळण्यासाठी पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येत असल्याचा भ्रम निर्माण करत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने जारी केलेल्या नव्या यादीनुसार दहशतवादी गटांच्या 88 नेते आणि सदस्यांवर आणखी निर्बंध घातले होते. त्यात जमात-उद-दावाचा हाफिज सईद अहमद, जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद मसूद अझहर, झाकीउर रेहमान लखवी तसेच इब्राहिमचा समावेश आहे. सरकारने दहशतवाद्यांची देशातील बँक खाती गोठविली आहेत आणि मालमत्ता जप्त केली आहे. त्यांना विदेशात प्रवास करण्यासही बंदी घातली आहे, असे सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणीसंबंधी काहीच माहिती नाही
यास अनुसरून दहशतवादी गटांविरोधात कारवाई होत असल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी, प्रत्यक्षात किती कारवाया अंमलात आणल्या गेल्या आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. पाकिस्तान ‘एफएटीएफ’च्या काळय़ा सूचीत समावेश होणे टाळण्यासाठी आणि ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर पडण्यासाठी जोरात धडपडत आहे. सदर देश जून, 2018 पासून ‘ग्रे लिस्ट’मध्ये आहे.









