राजू चव्हाण/ खेड
कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील दुमजली बंगल्यास 11 लाख 30 हजाराची बोली लावत विकत घेणाऱया दिल्लीतील ऍड. अजय श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्तेचा ताबा घेतला. दाऊदचा दुमजली बंगला जमीनदोस्त न करता बंगल्याचे नूतनीकरण करून येथे लहान मुलांना धडे देणारी शाळा सुरू होणार आहे. यासाठी सनातन धर्म पाठशाळा ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून लवकरच सुरू होणाऱया शाळेमुळे दाऊद इब्राहिमची सारी ओळख कायमचीच पुसली जाणार आहे.
गुन्हेगारी जगतात अधिराज्य गाजवणारा दाऊद इब्राहिम मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर खऱया अर्थाने चर्चेत आला. मुंबकेतील 2 मजली बंगल्यासह 6 जमिनी, आंबा कलमांची बाग व लोटे येथील एक फ्लॉट शासनाच्या ताब्यात गेला होता. या सर्व मालमत्तांचे ऍन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकन व मूल्य निर्धारण करण्यात आले होते. गतवर्षी 10 नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे मुंबकेतील दाऊदच्या सर्व मालमत्तांचा लिलाव झाला होता.
यातील 6 मालमत्तांच्या लिलावात ऍड. श्रीवास्तव यांनी 11 लाख 30 हजाराची बोली लावत मालमत्ता खरेदी केली होती. गतवर्षी 2 नोव्हेंबर रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांसमवेत मालमत्तेची पाहणी केली होती. सरकारच्या परवानगीने या ठिकाणी नवी इमारत उभारून स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभी करण्याचा मानस ऍड. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मालमत्तांची मोजणी प्रक्रियाही पूर्ण झाली. ऍड. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात रजिस्टरबाबतच्या साऱया प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केलेल्या सर्व मालमत्तांचा ताबाही घेतला. यानंतर खरेदी केलेल्या बंगल्याचे नामकरण चित्रगुप्त भवन असेही करण्यात आले आहे. तसेच सनातन पाठशाळा सुरू करण्याबाबतचा फलकही लावण्यात आला आहे.
दाऊद इब्राहिमला 9 ते 10 भावंडे असल्याचे मुंबकेतील ग्रामस्थ सांगतात. यातील दोघेजण गावीच रहायचे. त्यांच्या एका बहिणीचे जगबुडी नदीपात्रात बुडून निधन झाले. बहिणीच्या निधनाने दाऊद इब्राहिमला अतीव दुःख होवून गावी फिरकेनासा झाला. 1978मध्ये त्याने मुंबके येथे दोन मजली बंगला बांधला. मात्र, बहिणीच्या अकाली निधनाने बंगल्याकडे दुर्लक्षच होवून बंगल्याचे कामही अर्धवटच राहिले. 1986च्या दरम्यान तो विवाहबद्ध झाल्यानंतर तो देश सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे. ही सारी ओळख आता पुसली जाणार असून दाऊदच्या दुमजल्याच्या ठिकाणी उभ्या राहणाऱया सनातनी शाळेची साऱयांनाच उत्सुकता लागली आहे.
सनातन पाठशाळेत लहान मुलांचा आवाज घुमणार
ज्या बंगल्यात कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे बालपण गेले, तो बंगला न पाडता नूतनीकरण करून येथे लहान मुलांना धडे देणारी सनातन पाठशाळा सुरू करणार आहे. दाऊद इब्राहिम मदरसांना मदत करायचा. याच भावनेतून दाऊदच्या दुमजली बंगल्यात ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विश्वस्तांची नियुक्तीही करण्यात येणार असून लवकरच ही शाळा सुरू होईल, असे ऍड. अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.









