स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभी करण्याचा मानस : बंगला विकत घेतलेल्या ऍड. अजय श्रीवास्तव यांचा निर्णय
प्रतिनिधी / खेड
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव मुंबके येथील 6 मालमत्तांच्या लिलावानंतर दुमजली बंगल्याच्या ठिकाणी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभारण्याचा मानस बंगला खरेदी करणाऱया ऍड. अजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऍड. अजय श्रीवास्तव यांनी दाऊदचा दुमजली बंगला 11 लाख 30 हजार रूपयांची बोली लावत विकत घेतला आहे. 2 नोव्हेंबर रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांसमवेत त्यांनी या मालमत्तेची पाहणी केली होती. त्यानंतरच लिलाव प्रक्रियेत सहभागी होत 11 लाख 30 हजार रूपयांची बोली लावली होती. लिलावादरम्यान खरेदी केलेला बंगला पाडून त्या ठिकाणी सरकारच्या परवानगीने नवी इमारत उभारून तेथे स्वयंसेवी संस्था किंवा शाळा उभी करण्याचा मानस ऍड. श्रीवास्तव व्यक्त केला आहे. ऍड. श्रीवास्तव यांनी यापूर्वी 2001 मध्ये मुंबई-ताडदेव येथील 300 चौरस फुटाचा कमर्शियल गाळा 2 लाख 50 हजार रूपयांमध्ये विकत घेतला होता. मात्र या लिलावाला दाऊदची बहीण हसिना परकार यांनी न्यायालयात आव्हान दिल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.









