रत्नागिरी शहरापासून लांब असल्याने फेरविचार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहराच्या विस्तारिकरणाचा भविष्यातील 30 वर्षांचा विचार करून उभारल्या जाणाऱया दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेर आराखडा करावा लागणार आहे. एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने पालिकेने फेर आराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. पहिला आराखडा सुमारे 15 कोटी घनकचरा प्रकल्पाचा होता. शहराजवळील दांडेआडोम येथे सुमारे 15 कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. सुमारे अडीच हेक्टर जागेवर हा प्रकल्प असून कचऱयावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत.
या प्रकल्पातून प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी पालिकेने केला आहे. त्याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा 1 कोटी 65 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्याचा पालिकेचा विचार आहे. शहरापासून काही किमी लांब असल्याने त्याचा विचार करून फेर आराखडा तयार केला जाणार आहे.









