श्रृंगेरी कॉलनी येथील घटनेत 11 हून अधिक जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
दांडिया खेळून घरी परतणाऱयांच्या अंगावर मारुती 800 कार गेल्याने 11 हून अधिक जण जखमी झाले. ऐन दसरोत्सवाच्या दिवशी शुक्रवारी रात्री श्रृंगेरी कॉलनी-खासबाग येथे ही घटना घडली असून सर्व जखमींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. जखमींमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा समावेश आहे.
दसरोत्सव मिरवणुकीत वाहने अंगावर गेल्याच्या घटना वेगवेगळय़ा राज्यात घडल्या आहेत. बेळगावातही अशी घटना घडली असून ब्रेक दाबण्याऐवजी चालकाचा एक्सिलेटरवर पाय पडल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. शनिवारी रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्व जखमींवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
ज्योती बाळू जांगळे (वय 13), संध्या बाळू जांगळे (वय 16), स्नेहल बाळू जांगळे (वय 15), वर्षा बाळू जांगळे (वय 19), राजू जांगळे (वय 26), रेखा बाळू जांगळे (वय 42), कावेरी जोतिबा मण्णिकेरी (वय 27), प्रभू जांगळे (वय 21), प्रदीप मुतगेकर (वय 40) अशी जखमींची नावे आहेत. याच घटनेत रामलिंग व सुनील हेही जखमी झाले आहेत.
केए 22 एन 4928 क्रमांकाची मारुती कार अंगावर गेल्याने ही घटना घडली आहे. संबंधितांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वाहतूक दक्षिण पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच शहापूरचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील, शाम दोडनायकर, सुरेश कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वाहतूक दक्षिण विभागाचे आर. आर. गोजगेकर, आशिष परीट हेही दाखल झाले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने खासगी इस्पितळात हलविले. दोन खासगी व एक सरकारी इस्पितळात जखमींवर उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत रेखा जांगळे व त्यांच्या मुलीही जखमी झाल्या आहेत. ऐन दसरोत्सवाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर एकच धावपळ उडाली. या संबंधी शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
कारवर दगडफेक
या घटनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक करुन कारच्या काचा फोडल्या. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार दांडियाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱया महिला, मुलींच्या अंगावर पाठिमागून कार गेल्याने ही घटना घडली आहे.









