प्रतिनिधी / देवगड:
क्रिकेट स्पर्धा पाहण्यास गेलेल्या दहिबाव खालची परबवाडी येथील सदाशिव संदीप परब (27) याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ‘लाली’ या नावाने तो परिचित होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव हा मंगळवारी दुपारी दहिबाव खालचीवाडी येथील एसटी स्टॅण्डनजीक सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. क्रिकेट मॅच बघत असताना छातीत दुखून त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या मित्रांनी त्याला तेथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ जामसंडे येथील सरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, पोलीस हवालदार एस. डी. कांबळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
काळीज पिळवटणारा आक्रोश
सदाशिव हा उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. तो एकुलता होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच रुग्णालयात आलेल्या सदाशिवच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी दहिबाव, मिठबाव व देवगड परिसरातील नागरिकांनीही रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, देवगड ग्रामीण रुग्णालयात बुधवारी सकाळी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पार्थिवावर दहिबाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी, काका, काकी असा परिवार आहे. देवगड येथील मच्छीमार तुषार पाळेकर यांचा तो मेहुणा होत. F`wB









