सोळा सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा, सहा अनुभवी खेळाडूंना स्थान
वृत्तसंस्था/ बेंगळूर/
टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी इंडियाने शुक्रवारी सोळा सदस्यीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली असून दहा हॉकीपटूंना ऑलिम्पिक पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय पीआर श्रीजेश व मनप्रीत सिंग यासारख्या अनुभवी खेळाडूंनाही त्यात स्थान मिळाले आहे.
टोकियोमध्ये ऑलिम्पिक पदार्पणाची संधी मिळालेल्या हॉकीपटूंत अमित रोहिदास, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, सुमित, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुर्जंत सिंग, ललित कुमार उपाध्याय यांचा समावेश आहे. याशिवाय सहा अनुभवी खेळाडूंनाही स्थान मिळाले असून त्यात माजी कर्णधार व गोलरक्षक पीआर श्रीजेश, मिडफिल्डर मनप्रीत सिंग, डिफेंडर्स हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार व आघाडीवीर मनदीप सिंग यांचा समावेश आहे. या सहा खेळाडूंनी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. अनुभवी डिफेंडर बिरेंद्र लाक्रा यालाही संघात स्थान मिळाले असून त्याला ऑलिम्पिक पदार्पणाची संधी मिळाली आहे. महिला संघाप्रमाणे पुरुष संघातही श्रीजेश हा केवळ एकच गोलरक्षक ठेवण्यात आला आहे. संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला मात्र या संघात स्थान मिळालेले नाही. या संघात पाच डिफेंडर्स, पाच मिडफिल्डर्स व पाच आघाडीवीरांचा समावेश आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या आकाशदीप सिंग व रमनदीप सिंग यांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. अलीकडे मनप्रीत सिंग संघाचे नेतृत्व सांभाळत आला आहे. ऑलिम्पिकसाठी कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याच्याकडेच नेतृत्व कायम राहण्याची अपेक्षा आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम यांनी संघाला यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एफआयएच प्रो हॉकी लीगमधील अर्जेन्टिनाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने जी कामगिरी केली ते पाहता संघ योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, असेच म्हणता येईल. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,’ असे ते म्हणाले. ऑलिम्पिकमध्ये भारताचा अ गटात समावेश असून याच गटात अग्रमानांकित ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, यजमान जपान यांचाही समावेश आहे.
भारताचा ऑलिम्पिक हॉकी संघ ः गोलरक्षक-पीआर श्रीजेश. डिफेंडर्स-हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा. मिडफिल्डर्स-हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, सुमित. फॉरवर्ड्स-शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुर्जंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग.









