प्रतिनिधी / पणजी
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या वाहतूक करमाफीच्या निर्णयाचा राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील 8 ते 10 हजार वाहनचालकांना लाभ मिळेल, असे निवेदन करुन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री व इतर सहकारीमंत्र्यांनी या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री माविन म्हणाले की, एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान कोविडमुळे सार्वजनिक क्षेत्रातील वाहन चालकांचे अक्षरशः हाल झाले. राज्यातील टॅक्सी चालकांना कोणताही व्यवसाय मिळू शकला नाही. 1 हजार पेक्षाही जादा बसेस अद्याप बंद आहेत. 4 हजार पेक्षा जास्त टॅक्सी बंद आहेत. मोटरसायकल पायलटांचा तर व्यवसायच गेला. रिक्षा चालकांनाही बेकारीचे दिवस आले. शिवाय छोटय़ा मालगाडय़ा अर्थात रिक्षा, टेंपो त्यांनाही ग्राहक मिळाले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रात हे सर्वजण जनतेला मदत करीत असतात. मंत्रिमंडळ बैठकीत खासगी बसचालक, मोटरसायकल पायलट, टॅक्सी चालक, रिक्षाचालक यांना गेल्या 6 महिन्यातील वाहतूक कर पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर केवढा परिणाम होईल, त्याचे कोष्टक तयार केलेले नाही, असे ते म्हणाले.
ज्यांनी कारवाई होईल म्हणून घाबरुन आपल्या घरातील दागिने गहाण ठेवून सरकारला कर भरला आहे, अशा वाहतुकदारांना त्यांनी भरलेला कर परत न करता तो पुढील सहा महिन्यांसाठी समाविष्ठ करुन घेतला जाईल, असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. सध्या कोरोना महामारीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील वाहन मालक तथा चालकांना जोरदार आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांना वाहतूक खात्यामार्फत कराची सूट देणे हे आमच्या भाजप सरकारचे कर्तव्य ठरले. मुख्यमंत्र्यांनी हे स्वप्न पूर्ण केले, असे माविन गुदिन्हो म्हणाले.









