निवडणुका पुढे ढकलण्यास आयोगाचा नकार : दोन वॉर्डांमध्ये पोटनिवडणूक
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील 8 जिल्हय़ांमधील 10 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या दोन वॉर्डांमधील पोटनिवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. निवडणुका पुढे ढकलण्यास आयोगाने नकार दिला असून वेळापत्रकाप्रमाणे 27 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या एक तास अगोदर कोरोनाबाधित मतदारांना मतदान करण्याची मुभा असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शी सूचनेनुसार निवडणुका घेण्याचा आदेश सर्व निवडणूक अधिकारी, पोलीस, आयोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱयांना देण्यात आला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 243 क आणि 243 झेड नुसार निवडणुका घेण्यासंबंधी आयोगाला असणाऱया अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकाळ संपलेल्या 8 जिल्हय़ांतील 10 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या दोन वॉर्डांसाठी पोटनिवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने यापुर्वीच वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामुळे वेळापत्रकात कोणताही बदल करणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बळ्ळारी जिल्हय़ातील बळ्ळारी महापालिका, बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील विजयपूर नगरपरिषद, रामनगर जिल्हय़ातील चन्नपट्टण नगरपालिका व रामनगर नगरपालिका तसेच चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील गुडीबंडे नगरपंचायत, शिमोगा जिल्हय़ातील भद्रावती नगरपालिका, तिर्थहळ्ळी नगरपंचायत, हासन जिल्हय़ातील बेलूर नगरपरिषद, कोडगू नगरपालिका व बिदर जिल्हय़ातील बिदर नगरपालिकेसाठी मंगळवारी मतदान होईल. तर हावेरी जिल्हय़ातील हिरेकेरुर नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र. 1 आणि बिदर जिल्हय़ातील हळ्ळीखेड नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र. 11 मध्ये पोटनिवडणूक होणार आहे.









