नाण्यासाठी पेट्रोल पंपावर दुचाकीस्वाराला धरले वेठीस
प्रतिनिधी / बेळगाव
दहा रुपयांची नाणी चलनामधून अद्याप बंद करण्यात आली नाहीत. मात्र, काही ठिकाणी ही नाणी घेण्यास नकार देण्यात येत आहे. तेव्हा याबाबत जिल्हाधिकारी आणि लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी खुलासा करावा आणि नाणी चलनात वापरण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
मध्यंतरी पाच रुपयांच्या नाण्यांबरोबरच दहा रुपयांची नाणी रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. आता दहा रुपयांची नाणी घेण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उचगाव रोडवरील एका पेट्रोल चालकाने तर चक्क नकार देऊन संबंधित दुचाकीत घातलेले पेट्रोल परत काढून घेतले. अशा प्रकारे वादावादीचे प्रकार घडत आहेत.
जिल्हाधिकाऱयांनी याबाबत जातीने लक्ष देऊन खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. अजूनही सर्वसामान्य जनतेमध्ये नाणी गोळा करण्याचा छंद आहे तर काही जण बचत म्हणून ही नाणी गोळा करत असतात. मात्र, अचानकपणे अशा प्रकारे नकार देण्यात येत असल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









