सावेलीतील घटनेनंतर ग्रामस्थांत हळहळ, पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी
प्रतिनिधी/ दापोली
दापोली तालुक्यातील सोवेली गावातील सिद्धी लाड हिने आपल्या दोन चिमुरडय़ांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. तिला तिची सासू जेव्हा दुधाच्या तांब्यावरून बोलली आणि त्यानंतर जेव्हा सिद्धी लहान मुलांना घेऊन रात्री घराबाहेर पडली, तेव्हा तातडीने तिच्या मागे जाऊन तिला थांबवले असते तर आज तीन जीव वाचले असते. त्यामुळे या कालावधीतील सुमारे दहा मिनिटांचे दुर्लक्ष सिद्धीसह तिघांच्या जीवावर बेतले, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
सिद्धी ही मंगळवारी रात्री आठ वाजता आपल्या लहान मुलांना जेवण भरवत होती. यावेळी तिची सासू तिला दुधाच्या तांब्यावरून काहीतरी बोलली. मात्र शीघ्रकोपी सिद्धी हिने हा राग डोक्यात घालून घेतला आणि ती आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आपले जीवन संपवण्यासाठी घराच्या बाहेर पडली. मात्र ती मुलांना शी-शूला घेऊन गेली असेल असा समज घरातील माणसांनी करून घेतला व सर्वजण घरातच थांबले. यावेळी तिचे सासू-सासरे व पतीदेखील घरातच होते. मात्र पाच ते दहा मिनिटांनंतरदेखील सिद्धी मुलांना घेऊन घरात न आल्याने सर्वांचे धाबे दणाणले व सर्वांनी शोधायला सुरुवात केली. या दहा मिनिटांच्या आत सिद्धी घराबाहेर पडली तेव्हा तिच्या पाठोपाठ घरातील कोणी गेले असते तर तिला जंगलात जाणाऱया विहिरीच्या रस्त्यावर अडवता आले असते आणि हा अनर्थ टळला असता, असे आता ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
सिद्धीची दोन्ही मुले प्रणित व स्मित हे वाडीमध्ये सर्वांचे लाडके होते. आज हे दोन छकुले आपल्यात नाहीत यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. अचानक झालेल्या या प्रकाराने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत दापोली पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता या घटनेची सर्व बाजूने चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकारी पूजा हिरेमठ यांनी सांगितले. सिद्धीचे कुणाशी भांडण होते का? सिद्धीच्या बाबतीत ज्या-ज्या शक्यता तपासण्याची गरज होती त्या सर्व शक्यता तपासून पाहण्याचे काम सुरू असल्याचेही हिरेमठ यांनी सांगितले.









