अचूक बातमी “तरूण भारत”ची; शुक्रवार 19 नोव्हेंबर 2021, सकाळी 11.00
● 9 ते 19 नोव्हेंबरपर्यंत 419 कोरोनामुक्तांची नोंद
● बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त वाढले
● मृत्यू कधी चार तर कधी शुन्यावर
● दीपावलीनंतरच्या दहा दिवसात आकडे स्थिरच
● 24 तासात वाढले नवे 22 रूग्ण
सातारा / प्रतिनिधी :
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दीपावलीच्या खरेदीसह सणाचा उत्साह वाढला होता. दीपावलीनंतरच्या दहा दिवसात कोरोनाची स्थिती काय राहते? याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष होते. मात्र दिपावलीनंतर 9 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीतही कोरोनाची आकडेवारी स्थिर राहिली असून कोरोना मुक्ती दुप्पट झाली आहे. दहा दिवसात 419 कोरोना मुक्तांची नोंद झाली आहे. मृत्यू दर मात्र कधी चार तर कधी शुन्यावर आहे. दीपावलीनंतरच्या दहा दिवसात आकडेवारी स्थिर राहिल्याने प्रशासनासह जिल्हावासियांनी काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 22 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
18 नोव्हेंबरला सर्वाधिक 188 कोरोनामुक्त
दीपावलीनंतर बाधितांची संख्या 30 च्या आत स्थिर राहिली आहे. कोरोनामुक्तांची आकडेवारी कमी-जास्त होत आहे. 9 नोव्हेंबरला 22 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 14 नोव्हेंबरला एकाही कोरोनामुक्ताची नोंद झाली नाही. मात्र 17 नोव्हेंबरला 59 तर 18 नोव्हेंबरला तब्बल 188 रूग्णांनी कोरोनावर मात केली. नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक कोरोनामुक्तीचा आकडा आहे. एकूणच दिपावलीनंतरच्या दहा दिवसात 419 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांच्या तुलनेत हा आकडा लक्षवेधी आहे.
मृत्यूदरही कमी-जास्त
दिपावलीनंतर दहा दिवसातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी पाहता 20 मृत्यूची नोंद झाली आहे. 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दिवशी प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली असून 14 नोव्हेंबरला एकही मृत्यू झालेला नाही. 16 आणि 17 तारखेला प्रत्येकी 4 मृत्यूची नोंद झाली आहे. या दहा दिवसात 20 मृत्यूची नोंद झाली आहे.
दहा दिवसातील आकडेवारी स्थिर
जिल्ह्यात याच वर्षात कोरोनाने थैमान घातले होते. मात्र गणेशोत्सवानंतर रूग्णवाढ कमी होऊ लागली. गणेशोत्सव झाला, नवरात्री पार पडल्या. इतर सणही उत्साहात झाले.जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाले असतानाच दिपावलीत खरेदीसाठी गर्दी वाढली होती. त्यामुळे दिपावलीनंतरचे दहा दिवसांच्या आकडेवारीकडे प्रशासनाचे लक्ष होते. मात्र रूग्णवाढ 30 च्या आत राहिली असून मृत्यू दर शुन्य ते चार पर्यंत आहे.
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,72,944
एकूण बाधित 2,51,778
कोरोनामुक्त 2,44,157
एकूण मृत्यू 6,466
सक्रीय रुग्ण 311
गुरूवारी जिल्हय़ात
बाधित 22
कोरोनामुक्त 22
मृत्यू 0, उशिरा नोंद 02









