प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग चक्रीवादळा धडककल्याला दहा दिवस उलटले असून अद्याप अर्धे पंचनामेही पूर्ण न झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. दापोली तालुक्यातील पूर्णतः पडझड झालेल्या घरांची संख्या 2212 असून त्यापैकी केवळ 389 घरांचे पंचनामे पूर्ण झाले. त्यामुळे नुकसान ग्रस्ताना आर्थिक मदत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. जोराचा पाऊस सुरु होण्यापूर्वी लोकांना पत्रे, कौलांसारख्या वस्तू आवश्यक असताना पंचनाम्यांना विलंब होत असल्याने मदत कधी मिळणार व जनजीवन कधी पुर्वपदावर येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दापोली आणि मंडणगड या सर्वाधिक नुकसान झालेल्या दोन तालुक्यात बाधित झालेल्या कच्च्या व पक्क्या घरांची संख्या 26 हजार 365 एवढी असून त्यातील 21 हजार 665 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मंडणगड तालुक्यात पूर्णतः मोठय़ा प्रमाणात पडझड झालेल्या घरांची संख्या 1500 आहे. यातील 1230 घरांचे पंचनामे पूर्ण झाले. दापोली तालुक्यातील 2212 एवढी पूर्ण पडलेल्या घरांची संख्या असून त्यापैकी केवळ 389 घरांचे पंचनामे पूर्ण झाले.
अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या मंडणगड तालुक्यात 12 हजार एवढी असून त्यापैकी 8560 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. दापोलीत कच्च्या घरांची संख्या 9022 असून त्यापैकी 5112 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
कर्मचारी व्यवस्थापन आवश्यक
कर्मचाऱयांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे केले पाहिजे. कर्मचारी व साधसामुग्री कमी पडत असेल तर अन्य जिह्यातून मदत घेतली पाहीजे. जिल्हय़ात सर्व आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना आपद्ग्रस्त जनतेला वाऱयावर सोडण्यात आले आहे.









