ऊस तोडणी कामगारावर कोल्हापुरातील अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये शस्त्रक्रिया
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोयता लागल्याने ऊसतोडणी मजुराचा हात मनगटापासून वेगळा झाला. त्याला हसूर चंपू येथून गडहिंग्लजला खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून त्याला तातडीने कोल्हापुरातील अनंत प्लास्टीक सर्जरी सेंटरमध्ये दाखल केले. त्याच्यावर सायंकाळी 6 वाजता सुरू केलेली शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यत सुरू होती. शस्त्रक्रियेद्वारे हाताशी निगडीत 31 नसा, रक्तवाहिन्या हाडे जोडण्यात डॉ. मयुरेश देशपांडे यांच्या टीमला यश आले. त्यानंतर निर्जीव बनलेल्या हातात रक्तप्रवाह सुरू झाला. अन् रूग्णाचा हात वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
गडहिंग्लज तालुक्यातील हसुरचंपू येथे शेतात ऊस तोडणी सुरू होती. ऊस तोडून ट्रक्टरमध्ये भरत असताना एका ऊसतोडणी कामगाराला दुसऱ्या ऊसतोडणी कामगाराचा कोयता अनपेक्षितपणे लागला, अन् हात मनगटापासून वेगळा झाला, त्याला तशाही स्थितीत गडहिंग्लज येथील डॉ. हत्तरगी यांच्या हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 वाजता दाखल केले. रूग्णाची स्थिती पाहून त्यांनी या रूग्णाला तातडीने येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटरकडे पाठवले.
अनंत हॉस्पिटलमध्ये येताच रूग्णाच्या प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. सायंकाळी 6 वाजता त्याचा तुटलेला हात जोडण्यासाठी डॉ. मयुरेश देशपांडे, शशिकांत सागावकर, मंगेश धनवडे, डॉ. हृषिकेश अजित लवगारे यांच्या टीमने शस्त्रक्रियेला सुरूवात केली. पहाटे 4 वाजेपर्यत सुरू असलेल्या शस्त्रक्रियेत हाड अन् मनगटाशी निगडीत असलेल्या 31 बाबी जोडण्यात आल्या. त्यामध्ये हाडे, नस, रक्तवाहिन्यांचा समावेश होता. हळूहळू जोडलेल्या हातात रक्तप्रवाह सुरू झाला, अन् 12 तासानंतर हात हलू लागला. सप्ताहभरात हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर हा रूग्ण पुर्णपणे बरा झाल्याची माहिती डॉ. मयुरेश देशपांडे यांनी दिली.