राज्यातील तब्बल दहा मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. याचा आनंद आहे. पण भारतरत्न प्रमाणेच महाराष्ट्रभूषण पुरस्कारापासून ही मान्यवर वंचित राहत आहेत. यासाठी व्यापक धोरणच हवे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रसरकारने महाराष्ट्रातील तब्बल दहा मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित केले. ज्ये÷ गायिका, डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, कोविशिल्डचे निर्माते सायरस पूनावाला यांना पद्मभूषण, फलटणच्या निंबकर ऍग्रिकल्चर इन्स्टिटय़ूटचे संचालक अनिल राजवंसी, वैद्यकीय सेवाक्षेत्रातील डॉ. विजयकुमार डोंगरे व डॉ. भीमसेन सिंघल, आयुर्वेदाचार्य स्व.डॉ. बालाजी तांबे, विंचूदंश व सर्पदंश औषधाचा शोध, महाड येथे संशोधन केंद्रातून, गोरगरिबांवर मोफत उपचार करून कोकणातील सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर, ठसकेबाज लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्राचा लौकिक वाढविणारे ठरले आहेत. कर्तबगारांच्या मांदियाळीत सोनु निगमसुद्धा न्हाऊन निघाला आहे!
याच दरम्यान राजकीय वाद रंगला आणि तो भारतरत्न आणि पद्मपुरस्कारावर येऊन थांबला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांचे ट्विट आले नाही यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सेनेला डिवचले तर खा. संजय राऊत यांनी प्रत्युत्तरादाखल लोक पद्म पुरस्कार परत करत असतानाही भाजपकडून दिले जात आहेत. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किंवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण जाहीर करावा असे भाजपला वाटले नाही अशी टीका केली. या टीकेत तथ्यही आहे. केवळ राजकीय कारणांमुळे अनेक मंडळी पुरस्कारापासून वंचित राहतात. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज अशा अनेकांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी खूप वर्षाची मागणी सर्व राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित झाली आहे. मात्र हा भावनिक मुद्दा केवळ पुरस्कार जाहीर करण्याच्या मागणी पुरताच चर्चेत राहतो. याला भारतरत्न आणि पद्म पुरस्काराप्रमाणेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारही अपवाद नाही. महाराष्ट्र भूषण मरणोत्तर दिला जात नाही. त्यात प्रवाहा विरोधातल्यांचे तर नावही घेतले जात नाही. महाराष्ट्राने गोविंदराव पानसरे, नरेंद्र दाभोळकर, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड, क्रांती विरांगणा हौसाबाई पाटील, बापूसाहेब काळदाते, एन. डी. पाटील, बी जे खताळ पाटील, मृणाल गोरे, निळू फुले, राम नगरकर, नामदेव ढसाळ, ग्रेस, वैज्ञानिक वसंतराव गोवारीकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, अजित वाडेकर, शाहीर साबळे, विठ्ठल उमप, काळू बाळू, प्राचार्य शिवाजीराव भोसले, कविवर्य नारायण सुर्वे, सिंधुताई सपकाळ, डॉ. अनिल अवचट, दिग्दर्शक सुमित्रा भावे, ज्ये÷ पत्रकार दिनू रणदिवे, गोविंदराव तळवलकर, निळकंठ खाडिलकर, डॉ. गेल ऑम्वेट, यांच्यासह अनेक मान्यवरांना हयातीत महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून वंचित ठेवले. डॉ. बाबा आढाव, शतकवीर केशवराव धोंडगे, साहित्यिक भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, दिग्दर्शक जब्बार पटेल, अमोल पालेकर, सई परांजपे, नागराज मंजुळे, अभिनेते अशोक सराफ, सचिन, नाम फाउंडेशनद्वारे वेगळा प्रयोग करणारे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, साहित्य-नाटय़ परिषदांना दिशा देणारे मोहन जोशी, कौतिकराव ठाले-पाटील, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, नाटकांचा विक्रम करणारे प्रशांत दामले, भरत जाधव, ज्ये÷ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. हरि नरके, देवदत्त दाभोलकर, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, संपतराव पवार, भारत पाटणकर यासारख्या असंख्य पात्र व्यक्तींकडे हयातीत दुर्लक्ष करतच आहोत. 2015 साली बाबासाहेब पुरंदरे यांच्या घोषणेनंतर वाद होऊन बंद झालेला पुरस्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गतवषी मार्चमध्ये आशाताई भोसले यांचे नाव जाहीर केल्याने पुर्नर्जिवित झाला. 1997 यावषी पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना जाहीर करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना तो पुरस्कार बाळासाहेब ठाकरे यांना द्यायचा होता. मात्र आपल्या सरकारचा पुरस्कार आपणच घेणार नाही अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आणि पुलंचे नाव सुचवले. मात्र राजकारणा इतकेच व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द गाजवलेले बाळासाहेब पद्म पुरस्काराने सन्मानित झाले नाहीत. पवारांना पुरस्कार दिला म्हणून मोदींवर टीका झाली तर केवळ राजकारणात आहेत म्हणून डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्यांना पद्म पुरस्काराने गौरवले गेले नाही. थोर माणसांच्या कामगिरीपेक्षाही तात्कालिक परिस्थिती पुरस्कारांवर स्वार होऊ लागल्यानेच अनेकांचे सन्मान होत नाहीत. हा पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीच्या सन्मानापेक्षाही त्या क्षेत्रात काम करणाऱया नवोदितांना ध्येय ठरवण्यास अधिक उपयुक्त असतो. सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा ज्या-त्यावेळी गौरव झाला तर पुन्हा कधीही असे वाद उद्भवणार नाहीत.
राज्यात सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, लता मंगेशकर, प्रभाकर पणशीकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, राज कपूर, व्ही. शांताराम, भीमसेन जोशी, विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने त्या त्या क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार दिले जातात. मात्र त्यात सातत्य नसते, अधिकार यांमध्ये उपकाराची भावना असते. त्यामुळे त्यांचे महत्त्व राखले जात नाही. लता मंगेशकर पुरस्कार तीस वर्षात अठरा व्यक्तींनाच प्राप्त झाले. तेच इतर पुरस्कारांचे. परिणामी फूग वाढत जाते. वाङमय, नाटय़, शिवछत्रपती क्रीडा, वनश्री, कृषी, पत्रकारिता, आदर्श गाव, स्वच्छ गाव पुरस्कार जाहीर होतात पण वादग्रस्तही तितकेच होतात. परिणामी हेतू साध्य होत नाही. याचा गांभिर्याने विचार करुन, उदार मुल्यमापनाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा भाषा गौरवदिनी जाहीर करुन महाराष्ट्र दिनी प्रदान सोहळा न चुकता घडला पाहिजे. तर ते पुरस्कार अधिक प्रभावी ठरुन त्या त्या क्षेत्राला चालना, सांस्कृतिक क्षेत्रात उत्साह वाढेल. राज्यकर्त्यांचे एक व्यापक धोरण म्हणून त्याची अंमलबजावणी केली तर लोकांना सत्तांतर झाले आहे हे पटेल.
शिवराज काटकर








