सातारा / प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दुपारपर्यंत आंदोलने सुरु होती. सकाळी आसरे(ता. कोरेगाव) येथील 9 जणांनी व पाटण तालुक्यातील निसरे येथील एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांचा जीव वाचवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच वडार समाजाच्यावतीने अर्धनग्न आंदोलनाला पोलिसांनी ब्रेक लावला. रिपाइं, दिव्यांग संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. एकुणच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आंदोलने असल्याने पोलिसांचा खडा पाहरा ठेवण्यात आला होता. पोलिसांचा ससेमिरा चुकत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विठ्ठल सहदेव सणस, रमेश महादेव चव्हाण, महेंद्र आनंदा सणस, लक्ष्मण सिताराम सणस, रामचंद्र मारुती सणस, मंदा संजय सणस, धर्मेंद्र चिमाजी सणस, अनिल गेणबा सणस, रुपेश सिताराम सपकाळ (सर्व रा. आसरे ता. कोरेगाव) यांनी धोम पुनर्वसन प्रकल्पाचे अनुषंगाने तुकाराम सणस व इतरांनी शासनाची फसवणूक करून जमिनी बळकावल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच सातबारा चुकीची नोंद दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लगेच त्यांना रोखले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाटण तालुक्यातील निसरे येथील युवराज सिंगआप्पा चव्हाण यांनी पाटण येथील सहाय्यक निबंधक संजय पवार श्रेणी-1 बीजे शिर्के यांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी होऊन सेवा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, तसेच दत्तकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची कलम 83 व 88 नुसार चौकशी करण्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.









