परीक्षा ठरल्या वेळीच होणार : मंडळाच्या तयारीवर खडपीठ समाधानी : प्रत्येकाच्या जीवनात दहावीची परीक्षा म्हणजे मैलाचा दगड
अशी आहे परीक्षेची व्यवस्था
- एका वर्गात फक्त 12 विद्यार्थी परीक्षा देणार
- विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा केंद्र
- विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था
- सामाजिक अंतर सक्ती पाळण्यासाठी स्वयंसेवक
- प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन आरोग्य कर्मचारी
प्रतिनिधी / पणजी
प्रत्येकाच्या जीवनात दहावीची परीक्षा म्हणजे मैलाचा दगड असून सदर परीक्षा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हिरवा कंदील दाखवला आहे. एका परीक्षा वर्गात केवळ 12 विद्यार्थी असतील. तसेच महाराष्ट्रातून येणाऱया विद्यार्थ्यांसाठी वेगळे केंद्र ठेऊन गोव्याच्या विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना खंडपीठाने काल शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी केली आहे.
गोवा ग्रीन झोनमध्ये गेल्यामुळे एसएससी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता पुन्हा कोरोना रुग्ण सापडल्याने गोवा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे 10 वी ची संपूर्ण परीक्षा तसेच 12वी च्या उर्वरीत विषयांची परीक्षा रद्द करावी, अशी याचना करून सेड्रिक वाझ, डॉ. अद्वैत देसाई, केनिझ इयान स्टिवर्ट सिल्वेरा, वॉल्टर मार्टीन यांनी याचिका सादर केली होती.
दत्तप्रसाद लवंदे यांनी हस्तक्षेप याचिका सादर करून परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार झालीच पाहिजे, अशी मागणी केली होती. ऍड. ए. एफ दिनिझ, ऍड. एल्ड्रिन आल्फोन्सो आणि ऍड. रायन मिनेझीस यांनी याचिकादारांच्या वतीने बाजू मांडली.
येत्या 21 मे 2020 पासून सदर परीक्षा होणार आहे. केंद्राने 1 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचने प्रमाण ऑरेंज आणि रेड झोनमधील जिह्यांत शाळा, कॉलेज सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे तेथे शालेय परीक्षाही घेतल्या जाऊ शकत नाहीत, अशी बाजू याचिकादाराच्या वतीने मांडण्यात आली.
शालांत मंडळाच्या तयारीवर खंडपीठ समाधानी
शालांत मंडळ आणि सरकारने घेतलेल्या काळजी व तयारीवर समाधान व्यक्त करून खंडपीठाने परीक्षेवर स्थगिती देण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी घेऊन खंडपीठाने सदर याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायालयीन कामकाज जेव्हा नियमित सुरू होईल त्या काळात सदर याचिका सुनावणीस ठेवण्यात येईल, असे या निवाडय़ात स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा घेण्यास कोणतीच बंदी नाही
ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी त्याला हरकत घेतली. केंद्र सरकारच्या दि. 1 मे च्या परिपत्रकाप्रमाणे शाळा, कॉलेजचे वर्ग सुरू केले जाऊ शकत नाहीत, मात्र परीक्षा घेण्यास कोणतीच बंदी घातलेली नाही. 4 मे पासून 2 आठवडे बंदी होती. ती 18 मे पर्यंत असून परीक्षा 21 मे पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच
यावेळी गोवा शालांत मंडळाने सादर केलेले उत्तर एजी पांगम यांनी खंडपीठासमोर ठेवले. दहावीच्या परीक्षेला 19680 विद्यार्थी बसणार आहेत व 1612 परीक्षा वर्ग असतील. त्यामुळे एका वर्गात फक्त 12 विद्यार्थी परीक्षा देतील. तसेच ज्या शाळेत विद्यार्थी शिकत होते तीच शाळा त्याचे केंद्र असेल, अशी आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पांगम यांनी दिली. कोणत्याही शाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असणार नाहीत. तसे असल्यास बाजूच्या शाळेत सामावून घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था
शाळांच्या बसगाडय़ा सुरू करून विद्यार्थ्यांना आणले जाईल. तसेच पालकांनी खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांना सोडण्याची मूभा असेल तसेच गरज पडल्यास कदंब बसगाडय़ा ठेवल्या जातील, अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली.
सामाजिक अंतर सक्ती पाळण्यासाठी स्वयंसेवक तैनात
सामाजिक अंतर ठेवण्याची सक्ती करण्यास स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. शाळेपासून 200 मीटर अंतरावर कोणाला प्रवेश असणार नाही. प्रत्येक मुलाला मास्कची सक्ती असेल. हातावर सेनिटायझर देऊनच शाळेत प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्याला सर्दी, तापाची लक्षणे असतील तर त्याला परीक्षेला बसायला दिले जाणार नाही. मात्र पुरवणी परीक्षा देण्याची संधी निकालानंतर दिली जाणार आहे.
गोव्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेगळी व्यवस्था
महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱया विद्यार्थ्यांना वेगळे केंद्र केले जाणार असून गोव्यातील विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. असे 260 विद्यार्थी असून त्यासाठी 23 वेगळे वर्ग ठेवण्यात आले आहेत.
स्वयंसेवकांसह प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन आरोग्य कर्मचारी
परीक्षकांना यापूर्वीच योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले आहे, प्रत्येक केंद्रावर 3 आरोग्य कर्मचारी असतील व आरोग्य केंद्राशी सतत संपर्कात असतील, असे खंडपीठाला कळविण्यात आले आहे.









