ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, अशी समाज माध्यमांवर माहिती फिरत होती. ही एक अफवा आहे. त्यामुळे निकालासंदर्भांत सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विश्वास ठेऊ नये, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (पुणे) सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हॉटसअप, फेसबूक वा सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या तारखांवर विश्वास ठेवू नका.
परीक्षांच्या निकालाची तारीख मंडळाच्या अधिकृत इमेलद्वारे, महामंडळाच्या संकेतस्थळावरुन तसेच प्रसिद्ध माध्यमांद्वारे सर्वांना कळविण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.








