सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ः सर्व शिक्षण मंडळांसह राज्यांच्या बोर्ड परीक्षांबाबत स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची अंतिम परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. याप्रसंगी ऑफलाईन परीक्षा रद्द करून पर्यायी पद्धतीने मूल्यांकन करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. सध्या बहुतांश शिक्षण मंडळांनी आणि राज्यांनी ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून त्याच्या अंमलबजावणीला आता गती येऊ शकते. त्यानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत.
सीबीएसई, आयसीएसईसह राज्यांच्या शिक्षण बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकेतून सीबीएसई, आयसीएसई आणि एनआयओएससह सर्व राज्यांद्वारे घेण्यात येणारी बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावताना सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देण्यात कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा देत ऑफलाईन परीक्षांना विरोध करणारी याचिका फेटाळली.
याचिकेबाबत नाराजी व्यक्त
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा पद्धतीच्या याचिका दाखल केल्या जात असल्याची टिप्पणी केली. तसेच अशा याचिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असेही ते म्हणाले. याप्रश्नी याचिकाकर्त्याला इशारा देतानाच न्यायालयाने अशाप्रकारच्या याचिका दाखल करण्यास स्थगिती दिली पाहिजे, असेही स्पष्ट केले.
पर्यायी मूल्यांकन पद्धतीची याचिकेतून मागणी
कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही शाळांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरू करण्यात आले नव्हते. तसेच वर्गही पूर्ण क्षमेतेने भरविण्यात आले नसल्याने काही ठिकाणी अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. अशास्थितीत ऑफलाईन परीक्षा नकोत, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा दावा होता. याप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी अपिलावर सुनावणीसाठी परवानगी दिली. त्यानंतर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने यासंबंधी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) मंडळासह इतर प्रतिवादींना बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. तद्नंतर खंडपीठाने बुधवारी या याचिकेवर सुनावणी करत ऑफलाईन बोर्ड परीक्षा घेण्यास कोणत्याही अडचणी नसल्याची स्पष्टोक्ती देत याचिका फेटाळण्यात आली.
सीबीएसई दुसरी सत्र परीक्षा 26 एप्रिलपासून
सीबीएसई बोर्डातर्फे दहावी आणि बारावीची दुसरी सत्र परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाने परीक्षेच्या तारखेची माहिती देणारी नोटीस जारी करतानाच नमुना प्रश्नपत्रिकाही जारी केल्या आहेत. टर्म-2 परीक्षेचे स्वरुप समजून घेण्यासाठी नमुना (मॉडेल) प्रश्नपत्रिका बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत. या नमुना प्रश्नपत्रिकेच्या मदतीने बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दुसऱया टप्प्यातील परीक्षा आणि मूल्यमापन पद्धत अगदी सहज समजू शकते. सदर प्रश्नपत्रिकांची प्रिंट विद्यार्थ्यांना सहजपणे घेता यावी, यासाठी या नमुना प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपातही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.