जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीच दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याचे शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी याबाबत बोलताना सांगितले की, दहावीच्या परीक्षेसाठी 415 परीक्षा केंद्रे जिल्हय़ामध्ये असणार आहेत. सीईटीच्या धरतीवरच ही परीक्षा होणार असून त्याबाबत सर्व तयारी करण्याची सूचना शिक्षण विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे नियम पाळत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रे निर्जंतुकीकरण करणे, तसेच विद्यार्थ्यांनी मास्क वापरण्यासाठी सूचना केल्या आहेत. स्पर्धात्मक परीक्षेसारखीच ही परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तरे असणार आहेत. केवळ विद्यार्थ्यांना त्यावर मार्किंग करावे लागणार आहे. या परीक्षेसाठी बस तसेच शिक्षक व कर्मचाऱयांची नेमणूक करण्याबाबत शिक्षण विभागाला सूचना केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.









