23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार : अभ्यासाला लागण्याच्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनानंतरचा कार्यकाळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विलंबाने सुरू झालेल्या शाळांना सामोरे जात कमी वेळेत अभ्यास करावा लागणार आहे. परीक्षेचा अर्ज भरला असल्याने खऱया अर्थाने विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. 15 फेब्रुवारी ही दहावी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. त्यामध्ये वाढ करत 23 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली
आहे. परीक्षेचा अर्ज भरल्याने आता विद्यार्थ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना शिक्षक आणि पालकांकडून करण्यात येत आहेत. अंतिम परीक्षेची तारीख जाहीर होताच परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यात येत आहेत. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र शिक्षण खात्याने संभ्रम दूर करत दहावीचे वर्ग सुरू करण्याबरोबरच तात्काळ परीक्षेची तारीखही जाहीर केली. यामुळे वर्ग सुरू होताच अर्ज भरण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो, शिवाय आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव शाळास्तरावर करण्यात आली होती. परीक्षेची तारीख जाहीर होताच सोयीनुसार 1 फेबुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान परीक्षेचे अर्ज भरण्यात आले आहेत. सोमवारी परीक्षा अर्जाची अंतिम तारीख असल्याने शाळास्तरावर लगबग पहायला मिळाली. दरवर्षी विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासून परीक्षेचा अर्ज भरला जात होता. मात्र यंदा उपस्थितीची सक्ती न करता सरसकट दहावीतील प्रत्येक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरवत अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे उपस्थिती तपासण्याची गरज यंदा भासली नाही. दरवर्षी दहावी परीक्षेच्या अर्जाची तारीख वाढविण्यात येते. यंदाही परीक्षा अर्ज भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून सोमवारी दुपारी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध झाले आहे. आता दि. 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली
आहे.









