कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाययोजना : परीक्षा केंद्रांवरील शिक्षक, अधिकाऱयांचे होणार लसीकरण
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे लांबणीवर पडलेली दहावीची परीक्षा जुलै महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात आयोजिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या खबरदारी उपाययोजना कराव्यात, यासंबंधीची मार्गसूची बुधवारी जारी करण्यात आली आहे. सदर मार्गसूचींनुसार तयारी करण्याची सूचना शिक्षण खात्याने दिली आहे. परीक्षा प्रक्रियेतील सर्व कर्मचाऱयांचे लसीकरण, परीक्षा केंद्रांमध्ये सॅनिटायझेशन, एका बाकावर एक विद्यार्थी यासह विविध सुरक्षा उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी सूचना मार्गसूचीद्वारे देण्यात आली आहे.
शिक्षण खात्यातील सर्व स्तरातील अधिकारी, संबंधीत खात्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओ यांच्याशी समन्वय साधून मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, जारी करण्यात आलेल्या मार्गसूचींबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार 28 जून रोजी सर्व जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकाऱयांची पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.
परीक्षेच्या कामात गुंतलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा केंद्रप्रमुख आणि अधिकाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी. परीक्षा कालावधीपर्यंत किमान लसीचा एकतरी डोस घेतलेला असावा, अशी सूचना देण्यात आली आहे.
परीक्षेपूर्वी, परीक्षेनंतर निर्जंतुकीकरण
शहरी, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड्स सोल्यूशनचा वापर करून प्रत्येक परीक्षा केंद्रात परीक्षेपूर्वी आणि परीक्षेनंतर निर्जंतुकीकरण करावे. परीक्षा केंद्रांमधील सर्व खोल्या आणि उपकरणांची 2.5 टक्के लायसोल किंवा सॅनिटायझरने स्वच्छता करावी. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना आणि आतमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे किंवा दोन मीटर अंतर राहील, अशी व्यवस्था करावी.
एका खोलीत 12 विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था
प्रत्येक खोलीमध्ये 12 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था करू नये. एका विद्यार्थ्याला एक बाक असावा. दोन विद्यार्थ्यांमधील अंतर किमान 6 फुटांचे असावे. परीक्षा केंद्रावर सूचना फलकासमोर विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे मार्गसूचीत स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी गटागटाने एकत्र जमणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली जावी, असे सूचित करण्यात आले आहे.
पाणी, जेवण घरातूनच आणावे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुका केंद्रातच परीक्षेची व्यवस्था करावी. प्रत्येक तालुका आणि जिल्हा केंद्रांमध्ये किमान दोन अतिरिक्त परीक्षा केंद्रांची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेआधी शक्य तितक्या लवकर हजर व्हावे. प्रत्येक विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याची बाटली स्वतः घरातून आणावी. अनुकूलतेनुसार घरातूनच जेवणाचा डबा आणावा.
सर्दी, खोकला, ताप आदी आजार असणाऱया किंवा लक्षणे असणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी किमान दोन खोल्यांची आधीच व्यवस्था करावी. एखाद्या वेळस विद्यार्थी योग्य आकाराचे आणि उत्तम प्रतीच्या कापडाचे मास्क परिधान करून परीक्षा केंद्रावर हजर झाल्यास त्याला मुभा द्यावी, अन्यथा त्यांना मास्क वितरीत करावे. ताप, सर्दी, खोकला असणाऱया विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याआधी एन-95 मास्क द्यावा, असा उल्लेखही मार्गसूचीमध्ये करण्यात आला आहे.
हेल्थ काऊंटरची सुविधा असणार

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सकाळी 8.30 वाजल्यापासून परीक्षा संपेपर्यंत हेल्थ काऊंटर कार्यरत असणार आहे. तेथे थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्सिमीटर, प्रथमोपचार पेटी आदी व्यवस्था करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. याच काऊंटरवर विद्यार्थ्यांना मास्क वितरण आणि हॅन्ड सॅनिटायझर दिले जाणार आहे.
– एस. सुरेशकुमार, शिक्षणमंत्री









