मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोवा शालांत मंडळातर्फे 10वीच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक परीक्षेच्या 10 दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता 9 वी व 11वी तील विद्यार्थ्यांचे शालेय अंतर्गत गुण विचारात घेऊन त्यांना उत्तीर्ण ठरविण्यात येणार आहे. मात्र ज्यांचे अंतर्गत अहवाल समाधानकारक नाहीत अशांना अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल. तथापि, त्यांच्यासाठी इयत्ता 10वी व 12वीत जाण्यापूर्वी 10 दिवस अगोदर नोटीस देऊन परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
केंद्रीय परीक्षा मंडळाच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक क्षेत्रात शुक्रवारी फार मोठे निर्णय घेतले व राज्यातील इयत्ता 9 वी तील विद्यार्थ्यांनी त्यांचे वर्षभरातील विविध परीक्षांतील निकाल गृहित धरून उत्तीर्ण ठरविले जाईल. तदव्त इयत्ता 11वी तील विद्यार्थ्यांना देखील अशाच पद्धतीचे निकष लावले जातील. त्यामुळे 9वी व 11वी च्या परीक्षा रद्द ठरल्या आहेत. तथापि, या दोन्ही इयत्तेतील एका विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अहवाल चांगला नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येईल व अनुत्तीर्ण ठरणाऱयांना पुन्हा परीक्षेला बसून उत्तीर्ण होण्यीची संधी प्राप्त होईल. या परीक्षा देखील 10 दिवस अगोदरच जाहीर केल्या जातील.
राज्यात सध्या लॉकडाऊन चालू असल्याने 10 वी व 12 वीच्या परीक्षा घेता येत नाही 10वीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाशी चर्चा केलेली आहे. तथापि, योग्य वेळी या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तत्पूर्वी 10 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यास विनाखंड चालूच ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 12वीचे केवळ तीन पेपर्स शिल्लक राहिलेले आहेत ते देखील लवकरच घेतले जातील. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना 10 दिवस अगोदर अभ्यासासाठी कालावधी मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात यावयाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. मात्र तेथे देखील 10 दिवसांचा कालावधी मिळेल असे ते म्हणाले. सध्या शिक्षण खात्याने जे परीपत्रक काढलेले आहे ती काही 10च्या मुलांची अंतिम परीक्षा नाही तर मुलांना त्यातून थोडे मार्गदर्शन मिळेल हाच उद्देश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.









