प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेत अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इ. 1 ली ते 10 वीच्या पाठय़पुस्तकांतील 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. शाळास्तरावर पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र कोणते घटक कमी करायचे आणि कोणते घटक अभ्यासक्रमात अंतर्भूत राहणार, याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून पाठय़पुस्तकातील कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती शाळांना पुरविण्यात आली आहे. यामुळे यंदा कौशल्याधिष्ठीत पाठय़क्रम कमी झाला आहे.
शाळा केव्हा सुरू होणार? हा प्रश्न जैसे थे असला तरी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यास इयत्तानिहाय कौशल्य आत्मसात करणे सोपे जावे व अभ्यासक्रम संपविण्याचा ताण येऊ नये, यासाठी डीएसआरटीसीकडून पाठय़क्रमात कपात करण्यात आली आहे. यासाठी समिती गठीत इयत्तानिहाय, वयानिहाय व कौशल्यानिहाय घटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. यामुळे शाळा सुरू होतील, या दृष्टिकोनातून पूर्वतयारी केली जात आहे. यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका झाला असून अभ्यासक्रम संपविण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन शिक्षणाचा अट्टाहासदेखील थांबणार आहे.
प्रामुख्याने शालेय शैक्षणिक वर्ष साधारण 220 ते 240 दिवसांचे असते. यानुसार वार्षिक, मासिक तसेच घटकनिहाय नियोजन करून अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. मात्र यंदाचे शैक्षणिक वर्ष दोन-अडीच महिने लांबणीवर पडले असून पुढे सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत धुसरता आहे. यामुळे 30 टक्के कपात करून साधारण 120 ते 160 दिवसांचा अभ्यासक्रम अंतर्भूत करण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे असताना शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात कपात करून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबतची आशा पल्लवित केली आहे.
सेतुबंध कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाची तयारी
कोरोनाच्या संकटछायेत शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सध्या परिस्थिती नाही. मात्र नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल, या उद्देशाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. पाठय़पुस्तकांचे वितरण शाळास्तरावर करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळाली आहेत. यामुळे साधारण कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. सध्या चंदन वाहिनीवर सेतुबंध कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाची तयारी केली जात असल्याचे जिल्हा पाठय़पुस्तक विभाग प्रमुख एस. कंबळी यांनी सांगितले.









