प्रतिनिधी / पणजी
येत्या रविवारी 3 मे पर्यंत लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवार दि. 4 मे रोजी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (गोवा बोर्ड) कार्यकारी समितीची बैठक होणार असून त्यात दहावी-बारावी (शिल्लक) परीक्षा, त्यांचे आगामी निकाल याबाबत चर्चा तसेच महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीसाठी यंदा सुमारे 20,000 परीक्षार्थींनी नोंदणी केली असून ते सर्वजण परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. परीक्षा 12 एप्रिलपासून सुरु होणार होती. परंतु कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाले आणि ते आजपर्यंत कायम असल्याने परीक्षा होऊ शकली नाही. बारावीचे काही पेपर्स शिल्लक राहीले असून त्यांची तारीखही निश्चित होणार आहे. 5 व 6 मे रोजी जीसीईटी परीक्षा ठरली होती. ती सुद्धा पुढे ढकलणे भाग पडले आहे. दहावी-बारावी परीक्षेवरच त्या व इतर काही स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा अवलंबून आहेत.
दहावी-बारावी परीक्षा घेण्याचे निश्चित झाले तर शिक्षकांनी तयार रहावे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी परीक्षा केंद्रे, शिक्षक वाढवावे लागतील अशा सूचना बोर्डातर्फे शिक्षकांना देण्यात आल्या आहेत तसेच त्यांनी उत्तर पत्रिका तातडीने तपासण्याची तयारी ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.









