आधीच्या इयत्तेतील गुणांचा निकालावर प्रभाव : परीक्षा समितीमार्फत निकालाचे नियमन
यावर्षी गुणांची फेरपडताळणी नाही : अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया कोरोनाच्या सावटाखालीच
प्रतिनिधी / झाराप:
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण मंडळाला दहावीची परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यामुळे मूल्यमापन पद्धती नेमकी कशी असावी, याबाबत मंडळाने धोरण निश्चित करून त्याबाबतची कार्यवाही शाळा स्तरावर तीस जूनपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्य मंडळ यांच्या स्तरावरील प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळा स्तरावरील यासंदर्भातील कार्यवाही गुरुवारपासून सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असणाऱया माध्यमिक शाळातील नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी, पुनःपरीक्षार्थी, नोंदणीकृत खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी या सर्वांचीच मूल्यमापनाची तरतूद निश्चित करण्यात आली आहे.
अंतर्गत मूल्यमापनावर निकाल
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा स्तरावरील अंतर्गत मूल्यमापनावर निकाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 50 अधिक 30 अधिक 20 असे सूत्र निश्चित करण्यात आले. नियमित विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववीचा अंतिम निकाल (50 टक्के), इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन (30 टक्के) व अंतिम तोंडी प्रात्यक्षिक (20 टक्के) मूल्यमापनाच्या आधारे विषयनिहाय गुणदान होणार आहे.
इयत्ता नववीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय 100 पैकी प्राप्त गुणांचे 50 टक्के गुणात रुपांतरण होणार आहे. सूत्रातील 30 गुणांसाठी इयत्ता दहावीतील प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा यातील सर्वोच्च गुण असणाऱया परीक्षेतील 80 गुणांवरुन 30 गुणात रुपांतर करावे लागणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा झाली नसल्यास वर्षभरातील सराव चाचणी, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प या कार्याला 30 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. सूत्रातील विषयवार 20 पैकी गुण हे दरवषीप्रमाणे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक आदी मूल्यमापन प्रक्रियेवर देण्यात येणार आहेत.
खासगी, पुनःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी यापूर्वी इयत्ता पाचवी ते नववी यापैकी ज्या इयत्तेची अंतिम परीक्षा पूर्ण केली असेल, त्या परीक्षेचे गुण घेण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.
50 अधिक 30 अधिक 20 या मूल्यमापन सूत्रानुसार नववीतील 50 टक्के गुणांचा मोठा प्रभाव अंतिम गुणावर वास्तववादी राहणार आहे. 30 टक्के गुण हेही दहावीतील प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा या गुणांवरून ठरणार आहेत व उर्वरित 20 टक्के गुण हे दरवषीच्या अंतर्गत मूल्यमापनावरून देण्यात येणार आहेत.
वीस टक्के गुणांवर कोरोनाचे सावट
अंतर्गत मूल्यमापनाचे 20 टक्के गुण वर्षाच्या शेवटी तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन दिले जातात. परंतु यावषी कोरोना संकटामुळे व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे बहुतांशी शाळांमध्ये हे मूल्यमापन होऊ शकलेले नाही. सदरचे 20 टक्के मूल्यमापन हे ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने घ्यावे, असे निर्देश मंडळाकडून देण्यात आले आहेत. जिल्हय़ात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा असल्याने शाळांसमोर संकट उभे ठाकले आहे.
यावषी फेर गुणपडताळणी नाही
दरवषी दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची साक्षांकित प्रत तसेच गुणांची फेरतपासणी करण्यासाठी सशुल्क मागणी करण्याची संधी असते. मात्र, यावषी अशी संधी असणार नाही, असे बोर्डाकडून कळविण्यात आले आहे.
निकाल समितीमार्फत परीक्षण व नियमन
दहावीच्या निकालाबाबत एकूणच परीक्षण व नियमन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समितीने निकाल अंतिम केल्यानंतर विशिष्ट परिशिष्टानुसार सीलबंद अभिलेख मंडळाकडे 30 जूनपर्यंत सादर करायचे आहेत.
30 जूननंतर विभागीय मंडळ व राज्य मंडळ यांच्या स्तरावरील निकालाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सुरू होणार आहे. शासन व मंडळाच्या धोरणानुसार तसेच तरतुदीनुसार देय असलेल्या गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यात येणार असून उत्तीर्णतेबाबतचे निकष विचारात घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी म्हटले आहे.









